Iran War Live Update: इराण आणि अमेरिका यांच्यात सर्वात भीषण टप्प्यावर पोहोचला आहे. इराणने जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक असलेल्या 'होर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) बाबत आता आणखी एक गर्भित इशारा दिला आहे. इराणच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, आता अमेरिकेच्या लष्करी तळांना लागणारा कोणताही पुरवठा (दारुगोळा, इंधन, उपकरणे) या समुद्री मार्गातून जाऊ दिला जाणार नाही. आखाती देशांतील अमेरिकन तळांना मिळणारी बहुतांश मदत समुद्रमार्गेच येते, त्यामुळे हा रस्ता रोखणे हा अमेरिकेला खिंडीत पकडण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.
इराणने म्हटले आहे की, ते हा समुद्री मार्ग केवळ काही दिवस नाही, तर पुढील अनेक वर्षे बंद ठेवू शकतात. म्हणजेच, युद्ध थांबले तरी हा दबाव कायम ठेवण्याची त्यांची रणनीती आहे. बहरीन, युएई आणि कतार सारख्या देशांमधील अमेरिकन तळांना आता सामानासाठी महागड्या विमान सेवेवर किंवा इतर लांबच्या मार्गांवर अवलंबून राहावे लागेल. दुसरीकडे, इराणने 'टोल नाका' सुरू केल्याची चर्चा आहे. जे देश इराणचे शत्रू नाहीत, त्यांच्याकडून लाखो डॉलर्स (काही ठिकाणी 20 लाख डॉलर्सपर्यंत) घेऊन त्यांना प्रवेश दिला जात आहे, तर अमेरिका आणि इस्रायलच्या जहाजांना पूर्णपणे रोखले जात आहे. जगातील 20 टक्के तेल याच मार्गातून जाते. या संघर्षामुळे तेलाच्या किमती जागतिक स्तरावर प्रचंड वाढल्या आहेत, ज्याचा फटका भारत, चीन आणि युरोपलाही बसत आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला हा मार्ग पुन्हा उघडण्यासाठी अनेकदा अल्टिमेटम (अंतिम इशारा) दिला आहे. जर इराणने हा मार्ग मोकळा केला नाही, तर अमेरिका इराणमधील वीज प्रकल्प आणि ऊर्जा केंद्रांवर मोठे हल्ले करू शकते, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. मात्र, इराणने या धमक्यांना भीक घातलेली नाही. ट्रम्प यांनी युद्ध सुरु झाल्यापासून सातत्याने इराणला धमक्या दिल्या आहेत. मात्र, इराणने अमेरिकेच्या दोस्त राष्ट्राना होरपळून काढत, एअरबेसचा नायनाट करत ट्रम्प यांना सपशेल गुडघ्यावर आणलं आहे. त्यामुळे धमकी देत ते कालावधी वाढवत चालले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या