रामायणसाठी 700 कोटींची OTT डील क्षणार्धात धुडकावली; 4000 कोटी वसूल करण्यासाठी मेकर्सचा तगडा प्लॅन?
जयदीप मेढे April 04, 2026 01:13 PM

Ramayan OTT Offer: बॉलीवूडमधील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक ठरलेला रामायण (Ramayan) गेल्या तीन वर्षांपासून चर्चेत आहे. चित्रपटाचा टीझर समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्सुकता निर्माण झाली आहे.निर्माते नमित मल्होत्रा यांची ही महत्त्वाकांक्षी फिल्म दोन भागांमध्ये बनवली जाणार आहे. दोन्ही भाग एक वर्षाच्या अंतराने रिलीज होणार आहेत. या प्रोजेक्टवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला असून, आता तो खर्च कसा वसूल होणार याबाबत चर्चा सुरू आहे. (Bollywood)

700 कोटींची OTT डील नाकारली 

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 4000 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार होत असलेल्या या चित्रपटाला रिलीजपूर्वीच एका OTT प्लॅटफॉर्मकडून जवळपास 700 कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती. मात्र, नमित मल्होत्रा यांनी ही ऑफर नाकारल्याचे सांगितले जात आहे.  ही ऑफर कोणाकडून आली होती याविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

4000 कोटी वसूल करेल रामायण?

मिळालेल्या माहितीनुसार, मेकर्स 700 कोटींच्या ऑफरवर समाधानी नसून सुमारे 1000 कोटींची OTT डील करण्याचा प्रयत्न करत आहेत. उर्वरित सुमारे 3000 कोटी रुपये जागतिक थिएटर रिलीज आणि इतर स्त्रोतांमधून वसूल करण्याची योजना त्यांनी आखली असल्याचा सांगितलं जात आहे.

‘रामायण’च्या दोन्ही भागांपैकी प्रत्येक भागाचा खर्च जवळपास 2000 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. तुलना केली तर एस.एस. राजामौली यांच्या मोठ्या बजेटच्या चित्रपटांपेक्षा हा खर्च खूपच जास्त आहे. त्यामुळे या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करावी लागणार आहे.

‘धुरंधर 2’च्या मार्गावर रामायण?

धुरंधर 2’ने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असताना, आता एका भव्य चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. तब्बल 4000 कोटींच्या बजेटमध्ये तयार होत असलेली ‘रामायण’ ही फिल्म रिलीज झाल्यानंतर ‘धुरंधर 2’चेही रेकॉर्ड मोडू शकते, अशी चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धुरंधर: द रिवेंज प्रमाणेच या चित्रपटासाठीही तशीच रणनीती वापरण्याचा विचार आहे,असं सांगण्यात येत आहे. नमित मल्होत्रा यांनी चित्रपटाचे हक्क स्वतःकडेच ठेवले असून योग्य किंमत मिळाल्यावरच पार्टनरशी करार करण्याचा त्यांचा विचार आहे. तसेच, प्रथम फक्त Part 1 चे हक्क विकून Part 2चे हक्क रिलीजपर्यंत स्वतःकडे ठेवण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळे सध्या ‘रामायण’ हा प्रोजेक्ट केवळ भव्यतेमुळेच नव्हे तर त्याच्या कमाईच्या स्ट्रॅटेजीमुळेही चर्चेत आला आहे.

:

4000 कोटींच्या बजेटची 'ही' फिल्म धुरंधर 2 लाही देणार कडवी टक्कर! रिलीज होताच उडणार धुरळा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.