माहूर (जिल्हा नांदेड) : श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प.पू. मधुसूदनजी भारती गुरु अच्युत भारती महाराज (९५ )हे शनिवार,ता.४ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास इहलोक सोडून वैकुंठवासी झालेत.त्यांच्या इहलोकी जाण्याने असंख्य भक्तगन शोकसागरात बुडाले आहेत.
स्वर्गीय महंत प.पू.अच्युत भारती महाराज हे वैकुंठवासी झाले नंतर प.पू.मधुसूदनजी भारती महाराज हे सन १९७८ साली संस्थानच्या धार्मिक प्रक्रियेनुसार गादीवर विराजमान झाले होते.अत्यंत साधेपणा,अध्यात्मिक चिंतन आणि भक्तीभावासाठी ओळखले जात होते.त्यांनी आपल्या कार्यकाळात श्री दत्त शिखर संस्थानच्या धार्मिक परंपरा जपण्याबरोबरच भक्तांच्या सेवेसाठी स्वतःला अर्पण केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक धार्मिक उपक्रम,पूजा-अर्चा,तसेच उत्सव मोठ्या श्रद्धा आणि शिस्तीत पार पडत होते.
महाराजांच्या प्रवचनांमधून त्यांनी अध्यात्म, नैतिक मूल्ये आणि संस्कार यांचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचवला.त्यांच्या साध्या जीवनशैलीमुळे आणि प्रेमळ स्वभावामुळे ते सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकले होते.त्यांच्या निधनाची बातमी समजताच माहूर व परिसरातील भाविकांनी दत्त शिखराकडे धाव घेत अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी केली.अनेक संत,महंत,तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.
दरम्यान,त्यांच्या पार्थिवावर धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, संस्थानतर्फे पुढील कार्यक्रमांची माहिती लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
प.पू.मधुसूदनजी भारती महाराज यांच्या जाण्याने अध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून,त्यांच्या स्मृती आणि कार्य भाविकांच्या मनात कायम राहणार आहेत.
महंत महाराजांचे जीवन हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले. आपल्या सारखे आता कोणी होणे नाही,अशी भावना व्यक्त होत असून त्यांच्या आठवणी सदैव हृदयात जिवंत राहतील,असे सर्वत्र बोलले जात आहे.त्यांनी दिलेली शिकवण आणि आशीर्वाद यामुळे अनेकांनी आपल्या जीवनाची वाटचाल घडवली.त्यांच्या जाण्याने समाजाने एक थोर अध्यात्मिक मार्गदर्शक गमावला असून,ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.
माहूर सह परिसरातील सर्वच बाजार पेठा बंद
महंत मधुसूदनजी भारती महाराज यांना देवाज्ञा झाल्याची शोकवार्ता काही क्षणात सर्वदूर पसरली असून जणू काही या भागातील जनतेवर दुःखाचे डोंगर कोसळले, माहूर शहर वाई बाजार सहलगच्या परिसरातील बाजारपेठ उद्या (ता.५) कडकडीत बंद ठेवून श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले आहे.