Nashik News: विहीर बुजविण्याचे निर्देश; मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख; मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे यांची घटनास्थळी भेट; चौकशीचे आदेश; विहीरमालकावर गुन्हा दाखल
esakal April 05, 2026 01:45 PM

वणी: दिंडोरी येथे कार विहिरीत कोसळून सहा शालेय विद्यार्थ्यांसह नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या हृदयद्रावक घटनेनंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी (ता. ४) घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघातास कारणीभूत ठरलेली विहीर तातडीने बुजविण्याचे निर्देश त्यांनी दिले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधल्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

शनिवारी सकाळी पावणेदहाला मंत्री महाजन यांनी प्रथम दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात नातेवाइकांची सांत्वनपर भेट घेतली आणि सकाळी दहाला घटनास्थळाची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील उपस्थित होते. ‘ही घटना अत्यंत धक्कादायक आहे’ अशी भावना महाजन यांनी व्यक्त केली.

Nashik News: मुलाला नोकरीचे आमिष दाखवून आईवर अत्याचार ; संशयित रवींद्र एरंडेला पोलिस कोठडी सखोल चौकशी आणि कारवाई

या अपघातप्रकरणी विहीरमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्ताकामात झालेली हलगर्जी आणि नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी पूर्वी घेतलेल्या उपाययोजनांची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. रस्ताकामाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले. स्थानिक नागरिक आणि नातेवाइकांच्या तीव्र संतापानंतर प्रशासनाने ही धोकादायक विहीर पाडून ती बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.

मंत्री दादा भुसे यांच्याकडून सांत्वन

राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनीही घटनास्थळी आणि रुग्णालयाला भेट दिली. विद्यार्थ्यांच्या मृत्यूवर तीव्र शोक व्यक्त करत त्यांनी शिक्षण विभागाला विद्यार्थी विमा योजनेचा लाभ त्वरित देण्याच्या सूचना केल्या. या वेळी माजी आमदार धनराज महाले, रामदास चारोस्कर आणि इतर नेत्यांनी नातेवाइकांचे सांत्वन केले. प्रशासकीय हलगर्जीमुळे आपले प्रियजन गमावल्याची संतप्त भावना या वेळी नातेवाइकांनी व्यक्त केली.

Premium|Afzal Khan Pratapgad Visit : आदिलशाहीचा ‘शिवरायांचा पूर्ण विनाश’ हुकूम, अफजलखानाची क्रूर मोहीम आणि सह्याद्रीत उभा ठाकलेला प्रतापगडाचा संग्राम अशी होती धोकादायक विहीर

केवळ एक ते दीड फूट कठडा असलेली, ७० फूट खोल, १२ हात व्यास आणि तब्बल ३५ फूट पाणी असलेली ही विहीर रस्त्याच्या कडेला खऱ्या अर्थाने मृत्यूचा सापळाच बनून होती.

थोडक्यात
  • मृतांच्या वारसांना शासनाकडून पाच लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत.

  • अपघातास कारणीभूत ठरलेली विहीर युद्धपातळीवर बुजविण्यास प्रशासनाची सुरुवात.

  • जिल्हाधिकाऱ्यांमार्फत रस्ताकाम व प्रशासकीय त्रुटींची सखोल चौकशी होणार.

  • निष्काळजीपणा प्रकरणी विहीरमालकावर गुन्हा दाखल; रस्ताकामाचीही होणार चौकशी.

  • मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना शिक्षण विभागाकडून विद्यार्थी विमा योजनेचा लाभ देण्याचे निर्देश.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.