गावोगावी सुसज्ज मंदिरे उभारणीसाठी कटिबद्ध : मंत्री भरत गोगावले
esakal April 05, 2026 08:45 PM

गावोगावी सुसज्ज मंदिरे उभारण्यासाठी कटिबद्ध : मंत्री भरत गोगावले
हनुमान जयंतीनिमित्त निजामपूरात मंदिर जीर्णोद्धार व लोकार्पण सोहळे
माणगाव, ता. ५ (वार्ताहर) : हनुमान जयंतीनिमित्त निजामपूर परिसरातील कोस्ते खुर्द व मौजे शिरसाड येथील हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धार व लोकार्पण सोहळ्यात मंत्री भरत गोगावले यांनी उपस्थित राहून गावोगावी सुसज्ज मंदिरे उभारण्यास आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
हनुमान जयंतीच्या निमित्ताने कोस्ते खुर्द, मौजे शिरसाड तसेच निवाचीवाडी येथे दरवर्षीप्रमाणे हनुमान जन्मोत्सव व सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक सोहळ्यात सहभागी होत गोगावले यांनी हनुमानाचे दर्शन घेतले. ग्रामस्थांनी केलेल्या उत्स्फूर्त स्वागताबद्दल त्यांनी आभार मानले व ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे मंदिराचा जीर्णोद्धार यशस्वीपणे पूर्ण झाल्याचे नमूद केले.
धार्मिक परंपरा, संस्कृती आणि श्रद्धेचा संगम अशा उपक्रमांतून अनुभवायला मिळतो. ग्रामस्थांच्या सहकार्याने उभारलेली सुसज्ज व प्रशस्त मंदिरे ही भविष्यात श्रद्धा, सामाजिक ऐक्य आणि प्रेरणेची केंद्रे ठरतील, असे मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले. तसेच याकार्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची संधी मिळाल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.
मतदारसंघातील प्रत्येक गावात सुसज्ज मंदिरे तसेच सामाजिक-धार्मिक स्थळांची उभारणी व्हावी, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्य अविनाश नलावडे, पंचायत समिती सभापती विलास शिंदे, दत्तू पवार, राजा रणपिसे, मुंबईकर मंडळ, गुजरात मंडळ, महिलावर्ग, भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.