म्हाडा ३० हजार घरे उभारणार, राज्य सरकारकडे १०० एकर जागेसाठी पाठपुरावा सुरू
esakal April 06, 2026 12:45 AM

बापू सुळे

मुंबई : अटल सेतू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि प्रस्तावित तिसऱ्या मुंबईमुळे रायगड जिल्ह्यात घरांना मोठी मागणी आहे. मात्र, बजेटअभावी खासगी विकसकांकडे घर घेणे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाही. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाने पनवेल, उलवे परिसरात तब्बल २५-३० हजार घरांचा मोठा प्रकल्प राबवण्याची तयारी सुरू केली आहे. त्याकरिता या भागात जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत असलेली सुमारे १०० एकर जागा मिळावी, यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असून, लवकरच सकारात्मक निर्णय होणार आहे.

मुंबईसहएमएमआर क्षेत्रात ग्रोथ हब उभारण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्यासाठी वाहतुकीच्या पायाभूत सुविधांबरोबर घरांची उपलब्धता वाढवण्यावर केंद्र आणि राज्य सरकारकडून भर दिला जात आहे. तसेच तिसऱ्या मुंबईच्या उभारणीसाठीही राज्य सरकार एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याने रायगड जिल्ह्यातील पनवेल, उलवे, द्रोनागिरी परिसरातील घरांना मोठी मागणी आहे.

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

त्याची दखल घेत म्हाडाकडून या परिसरात गृहप्रकल्प राबवण्याची योजना आहे. परवडणाऱ्या घरांसाठी सरकारने १०० एकर जमीन उपलब्ध करून द्यावी, यासाठी म्हाडा प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून पुढील काही दिवसांत जवळपास ७० एकरांचा भूखंड मिळेल, अशी माहिती म्हाडाच्या कोकण मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

या परिसरात म्हाडाचा प्रकल्प नाही

म्हाडानेएमएमआर क्षेत्रात ठाणे, शिरढोण घोटेघर, खोणी, भंडार्ली, विरार-बोळिंज आदी ठिकाणी गृहप्रकल्प राबवले असले, तरी अद्याप नवी मुंबई, पनवेल, उलवे परिसरात घरे उभारलेली नाही. त्यामुळे या पट्ट्यात मोठा गृहप्रकल्प राबवण्याचा म्हाडाच्या कोकण मंडळाचा विचार आहे.

परवडणाऱ्या घरांचा पर्याय

सध्या पनवेल, उलवे परिसरात खासगी विकसकांकडून गृहप्रकल्प राबवले जात आहेत. त्यामुळे खरेदीदारांना उपलब्ध असलेली घरे घेण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, येथे म्हाडाने घरे उभारल्यास स्वस्त घरांचा पर्याय उपलब्ध होऊ शकेल.

Mumbai Water Supply: विहिरी, कूपनलिकांचे पुनरुज्जीवन करा, मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापौरांचे निर्देश

नवी मुंबईच्यापुढे पनवेल, उलवे या परिसरात घरांना असलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर २५-३० हजार घरांचा मोठा प्रकल्प राबवण्याचा विचार असून, त्याकरिता भूखंड मिळावा म्हणून सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.

- डाॅ. विशाल राठोड, मुख्य अधिकारी, कोकण मंडळ (म्हाडा)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.