कौशल्यातून रोजगाराकडे वाटचाल; स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षण
esakal April 05, 2026 09:45 PM

कौशल्यातून रोजगाराकडे वाटचाल
स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षण
माणगाव, ता. ५ (वार्ताहर) : ग्रामपंचायत पाटनूसअंतर्गत फणसीदांड आदिवासीवाडीत दोन महिन्यांचा गवंडी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या प्रशिक्षणात १५ युवकांनी सहभाग घेत बांधकाम क्षेत्रातील प्रगत तांत्रिक कौशल्ये आत्मसात केली.
या उपक्रमासाठी स्वदेश फाउंडेशनचे समन्वयक श्याम गिरकर व जितेंद्र म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी युवकांना कौशल्य विकासाचे महत्त्व, स्वरोजगाराच्या संधी आणि उत्पन्नवाढीच्या शक्यता याबाबत माहिती दिली. राजस्थानहून आलेले प्रशिक्षक प्रेम मेघवाल यांनी तात्त्विक व प्रात्यक्षिक पद्धतीने प्रशिक्षण देत साहित्याची गुणवत्ता तपासणी, सुरक्षितता नियम, मोजमाप तंत्र, नकाशा वाचन, खर्चाचा अंदाज आणि जागा व्यवस्थापन यांसारख्या बाबींवर सखोल मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणार्थ्यांनी दररोज चार तास प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर हे युवक स्वतंत्रपणे गवंडी काम करून विविध प्रकल्प हाताळण्यास सक्षम झाले असून, त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

चौकट
रोजगाराभिमुख प्रशिक्षण :
मागील १० वर्षांत ८००० हून अधिक युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगाराशी जोडण्यात आले आहे. लोणेरे केंद्रावर विविध रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन-तीन दिवसांत नोकरीच्या संधी तसेच स्किल इंडिया अंतर्गत सरकारी प्रमाणपत्र दिले जाते, असे लर्नेट संस्थेचे समन्वयक राहुल शिर्के यांनी सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.