खानिवडे वळणावर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी
esakal April 05, 2026 09:45 PM

खानिवडे येथील अपघातात दोन ठार, एक जखमी

बोईसर, ता. ५ (वार्ताहर) : ऐना-बोईसर मार्गावरील खानिवडे येथील धोकादायक वळणावर झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून, यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे शिगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये शरद घाटाळ (३०) व अनिकेत कामडी (१८) यांचा समावेश असून, जखमी विराज कामडी याच्यावर उपचार सुरू आहेत. तिघेही शिगाव रामपाडा येथील रहिवासी आहेत. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित दुचाकी बोईसरच्या दिशेने जात असताना खानिवडे येथील वळणावर एसटी बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न झाला. या वेळी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट बसच्या मागील चाकाखाली गेल्याने हा अपघात घडला. काही प्रत्यक्षदर्शींच्या मते, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली असावी.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. जखमीस तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या मार्गावरील धोकादायक वळण व रस्त्याची दयनीय अवस्था यामुळे अपघातांची मालिका सुरू असल्याची चर्चा असून, तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.