हाफसनआळी हनुमान मंदिरात भाविकांची मांदियाळी
भिवंडीत १११ वर्षांची पालखी परंपरा उत्साहात साजरी
भिवंडी, ता. ५ (बातमीदार) : शहराचे श्रद्धास्थान असलेल्या आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या हाफसनआळी हनुमान मंदिरात १११ व्या श्री हनुमान जयंती महोत्सवाची सांगता शुक्रवारी (ता. ३) भव्य पालखी सोहळ्याने झाली. थोर संत श्री शांतारामभाऊ जयवंत यांच्या कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाने भिवंडीनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
२६ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत आयोजित या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. भाविकांच्या उपस्थितीत विजय ग्रंथ पारायण व ज्ञानेश्वरीचे सामूहिक वाचन करण्यात आले. ह.भ.प. भानुदास महाराज सुमारे यांची अष्टपदी, भजन, हरिपाठ आणि कीर्तनाचे कार्यक्रम पार पडले. सांगता दिनी निघालेली पालखी प्रभूआळी, बाजारपेठ, वाणीआळी, ब्राह्मणआळी, कासारआळी आणि ठाणगे आळी मार्गे मार्गक्रमण करत पुन्हा मंदिरात विसावली.
मंदिराचा ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा
हाफसनआळी येथील हे हनुमान मंदिर शहरातील सर्वात जुने मंदिर मानले जाते. या मंदिराचा इतिहास केवळ धार्मिक नसून तो सामाजिक ऐक्याशीही जोडलेला आहे. १९७० च्या भीषण दंगलीच्या काळात जेव्हा हाफसनआळी परिसराचे मोठे नुकसान झाले होते, तेव्हा शेकडो कुटुंबांना या मंदिराने सुरक्षित आश्रय दिला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या मंदिराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. यामुळे या मंदिराला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
श्रद्धेचा उत्सव
गेल्या १११ वर्षांपासून ही परंपरा अविरत सुरू असून, संत शांतारामभाऊ जयवंत यांच्या मार्गदर्शनाखाली आजही तरुण पिढी हा वारसा तितक्याच श्रद्धेने पुढे चालवत आहे. महोत्सवाच्या सांगता प्रसंगी शहरातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.