रोजगार मेळाव्यात ४५० विद्यार्थ्यांना नोकरीची संधी
esakal April 06, 2026 04:45 AM

भिवंडी, ता. ५ (वार्ताहर) : बी. एन. एन. महाविद्यालयात शनिवारी (ता. ४) मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या वतीने झालेल्या रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदविला. सुमारे ४५० विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात नोकरीसाठी मुलाखती दिल्या. मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे सरचिटणीस ॲड. रोहित जाधव यांच्या हस्ते झाले. प्रभारी प्राचार्य डॉ. शशिकांत म्हाळुंणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना करिअरच्या सुरुवातीच्या संधींचे महत्त्व अधोरेखित केले. सुरुवातीला कमी पगार असला तरी त्या अनुभवातून भविष्यात मोठ्या संधी उपलब्ध होतात, असे त्यांनी सांगितले. रोजगार मेळाव्यात बँकिंग व फायनान्स, माहिती तंत्रज्ञान, एंटरटेन्मेंट व मीडिया; तसेच मानव संसाधन व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. सुधीर निकम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. तनझिल नाचन व प्रा. नीलम सेन यांनी केले, तर आभार उपप्राचार्य व आयक्यूएसी समन्वयक डॉ. कुलदीप राठोड यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ. सुरेश भदरगे तसेच अभिजीत शिरसाट उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.