Bharat Dabholkars Carry On SpyGiri: अनेक दशके, इंग्रजी, हिंदी तसेच गुजराती रंगभूमी गाजवणारे आणि अॅड गुरू भरत दाभोळकर (Bharat Dabholkar) आता एका नव्या इनिंगसाठी सज्ज झाले आहेत. लवकरच ते मराठी प्रेक्षकांसाठी एक नवीन सरप्राईज (Marathi Natak) घेऊन येत आहे. कॅरी ऑन स्पायगिरी या नाटकातून ते प्रथमच मराठी रंगभूमीवर (Marathi Theatre) पाऊल ठेवत आहेत. भरत दाभोळकर यांनी आता आपल्या कारकिर्दीत लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अशा तिहेरी भूमिका साकारल्या आहेत. आता ते लवकरच कॅरी ऑन स्पायगिरी या नाटकाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज होणार आहेत. अभिनेते आकाश भडसावळे यांच्या ‘सवाईगंधर्व’ आणि ‘अभिजात’ या दोन संस्थांची ही निर्मिती असून, अभिनेता विजय पटवर्धन आणि मुग्धा कर्णिक यांची 'केमिस्ट्री' या नाटकातून आपल्याला अनुभवता येईल.
झी मराठीवरील पारू या मालिकेमुळे विजय पटवर्धन आणि मुग्धा कर्णिक या जोडीला विशेष ओळख मिळाली. ही जोडी पुन्हा एकदा या नाटकाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या नाटताबाबत अभिनेते विजय पटवर्धन म्हणतात, "कॅरी ऑन SPYगिरी हे माझं 58 वं व्यावसायिक नाटक आहे. या नाटकातून मी आणि मुग्धा कर्णिक पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहोत. मुळात मुग्धा आणि माझी गट्टी 'घोळात घोळ' या नाटकापासून जमली होती. आम्हाला एकमेकांच्या कामाच्या पद्धतीची आणि 'टायमिंग'ची अचूक कल्पना आहे, त्यामुळे 'कॅरी ऑन SPYगिरी' मध्येही प्रेक्षकांना आमची तीच सहज केमिस्ट्री पाहायला मिळेल, यात शंका नाही. मालिका आणि नाटकात खूप फरक असतो. नाटकावेळी प्रेक्षक तुमच्या समोर असतो, त्याला दोन तास खिळवून ठेवणं ही कलाकाराची खरी कसब असते. आजच्या स्ट्रेसने भरलेल्या आयुष्यात विनोदी नाटक हा सर्वोत्तम विरंगुळा आहे. ‘कॅरी ऑन SPYगिरी’ नाटकात भरत सरांसोबत काम करण्याचा अनुभव उत्तम होता. त्यांच्या 'ब्लॅक ह्युमर'ची शैली प्रेक्षकांचा नक्कीच हशा वसूल करेल.
अभिनेत्री मुग्धा कर्णिक सांगते, "मराठी रंगभूमीला सध्या सुगीचे दिवस आले असून हे नाटक प्रेक्षकांना खळखळून हसवायला तयार आहे. 'पारू' या मालिकेमुळे गेल्या दोन वर्षांपासून विजय आणि मी एकत्र आहोत, ज्याचा फायदा नाटकाच्या तालमीतही होतो आहे. मात्र, मालिकेतली आमची पात्रं आणि या नाटकातली पात्रं एकमेकांच्या पूर्णपणे टोकाची आहेत. या नाटकाला दाभोळकरी 'पॅटर्न' मिळाल्यामुळे हे नाटक अजून खुलून निघालंय. भरत सरांची काम करण्याची पद्धत अत्यंत अभ्यासू असून त्यांच्या लिखाणातील 'राजकीय भाष्य' नाटकाला एक वेगळीच उंची देते. नाटकाच्या तालमींदरम्यान त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं."
'कॅरी ऑन SPYगिरी' या नाटकात मोहन आझाद, विजय पटवर्धन, मुग्धा कर्णिक, राहुल पेठे, आकाश भडसावळे, सुयश पुरोहित, गीतांजली गणगे, गौरव निमकर आणि स्वतः भरत दाभोळकर अशा तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. 10 एप्रिल रोजी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर, मुंबई येथे; तर 18 एप्रिल रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग होणार असल्याची माहिती आहे. अस्सल 'दाभोळकरी' शैलीतील हे स्पाय-कॉमेडी नाटक मराठी रंगभूमीवर एक नवा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाले आहे.