Beed News : बीडच्या अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मूळचा पुणे येथील रहिवासी असलेला मंदार उमेश दाभाडे वय 28 हा त्वचा रोग विषयात पदव्युत्तर शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. अंबाजोगाई ते चनई रोडवरील संत रविदास नगर भागातील एका इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर भाड्याच्या खोलीत तो राहत होता.
दरम्यान, मंदारने आत्महत्येपूर्वी घरमालकाला फोन पे द्वारे घर भाडे पाठवले होते. त्यानंतर पहाटे 5 च्या सुमारास त्याने आपल्या भावाला मोबाईलचा पासवर्ड पाठवला आणि खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. मंदारने गळफास घेण्यापूर्वी तोंडावर रुमाल बांधला होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली असून या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत.