Kolhapur Tourist Death : कोकण ट्रिपचा दुःखद शेवट! संगमेश्वरमध्ये कोल्हापूरच्या पर्यटकाचा नदीत बुडून मृत्यू; मित्रांसोबत फिरण्यासाठी गेला अन्...
esakal April 07, 2026 01:45 PM

संगमेश्वर : कोल्हापूरहून कोकणात आलेल्या पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. संगमेश्वर तालुक्यातील सोनवी नदीपात्रात पोहण्यास उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू (Kolhapur Tourist Dies) झाला. अजय शंकर बोरगे (वय ३५, रा. माऊली पुतळा परिसर राजारामपुरी, १४ वी गल्ली, कोल्हापूर) असे त्याचे नाव असून, रविवारी सायंकाळी ही घटना घडली.

संगमेश्वर पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अजय बोरगे अविवाहित असून, त्याच्या मागे आई, भाऊ असा परिवार आहे. वर्षापूर्वी एका खासगी कंपनीत तो चालक म्हणून काम करीत होता. त्याचा मावसभाऊ विनोद मोहन कलकुटकी (वय ४४) आणि इतर मित्रांसह मोटारीने संगमेश्वर येथील मित्र सागर याच्या आजोळी फिरण्यास आले होते. दुपारच्यावेळी सर्व मित्र लोवले येथील सोनवी नदीपात्रात पोहण्यास गेले होते.

Nashik Crime Case : एरंडेच्या कार्यालयात प्राण्यांचे अवयव; पेनड्राइव्हमध्ये सात महिलांचे 120 व्हिडिओ; महत्त्वाची कागदपत्रेही पोलिसांच्या हाती

नदीकिनारी जेवणाची जय्यत तयारी केली होती. जेवण तयार होईपर्यंत पोहण्याचा आनंद घेण्यासाठी ते पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने अजित पात्रात खोलवर बुडू लागला. मित्रांनी अथक प्रयत्नांनंतर त्यांना पाण्याबाहेर काढून तातडीने मोटारीने संगमेश्वर येथील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये नेले.

तेथील डॉ. मुळ्ये यांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर येथे नेण्याचा सल्ला दिला; मात्र, ग्रामीण रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तपासणी करून अजित याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. विनोद मोहन कलकुटकी यांनी दिलेल्या खबरीवरून संगमेश्वर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.