अशोक खरात फक्त टार्गेट, पुढच्या काळात…; बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
Tv9 Marathi April 07, 2026 02:45 PM

सध्या महाराष्ट्रात भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी विविध चौकशी सुरु आहे. अशोक खरातवर महिलांचे लैंगिक शोषण आणि अध्यात्माच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी आरोप करण्यात आले आहेत. त्यातच आता अशोक खरातची ईडी चौकशीही केली जाणार असल्याचे बोललं जात आहे. आता याप्रकरणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. अशोक खरात हे केवळ एक टार्गेट असून या प्रकरणाच्या आड इतर राजकीय खेळी सुरू आहेत” असा खळबळजनक दावा नाना पटोले यांनी केला आहे.

ईडीची कारवाई होणं स्वाभाविक

नाना पटोले यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अशोक खरात यांच्यावर झालेल्या ईडी (ED) कारवाईबद्दल विचारण्यात आले. या प्रकरणावर भाष्य करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अशोक खरातवर ईडीची कारवाई सुरु झाली. कारण यात आयएस, आयपीएस अनेक राजकीय लोकं यांचे विदेशात पाठवण्याचे काम खरातच्या माध्यमातून होत होतं अशा बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे ईडीची कारवाई होणं स्वाभाविक आहे. हे टार्गेट आहे, असे नाना पटोले म्हणाले.

अशोक खरात हे फक्त एक टार्गेट आहेत. या प्रकरणाचा वापर करून आगामी काळात कोणत्या मोठ्या राजकीय खेळी खेळल्या जाणार आहेत, हे महाराष्ट्राला लवकरच समजेल, असे सूचक विधानही नाना पटोले यांनी केले. यावेळी त्यांना अशोक खरात यांच्या पत्नी कल्पना खरातबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावरुनही त्यांनी सरकारवर टीका केली.

अशोक खरात प्रकरण साधं नाही

कल्पना खरात या फरार आहेत ती पोलिसांना का भेटत नाही, महाराष्ट्राचे पोलीस इतकं कमजोर झालं का किंवा गृहमंत्रालय याला कारणीभूत आहे का? मी तुम्हाला कालही सांगितलं आणि आताही सांगतो की हे अशोक खरात प्रकरण साधं नाही. अशोक खरात प्रकरणी अनेक गोष्टी पुढच्या काळात समोर येणार आहेत, असे नाना पटोले म्हणाले.

दरम्यान नाशिक येथील बहुचर्चित भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाची (SIT) आज महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरातविरुद्ध महिलांवरील अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांच्या तपासाची सद्यस्थिती आणि आतापर्यंत समोर आलेली ठोस माहिती एसआयटी या परिषदेत मांडणार आहे. विशेषतः पीडित महिलांनी दिलेले जबाब आणि पुराव्यांच्या आधारे खरातच्या गुन्हेगारी कृत्यांचा सविस्तर खुलासा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तर उद्या ८ एप्रिल रोजी अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आजची ही पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या प्रकरणातील तपासादरम्यान खरातला मदत करणारे त्याचे अनेक काळे कारनामे आणि त्याला साथ देणाऱ्या सूत्रधारांची माहिती पोलीस उघड करण्याची शक्यता आहे. या प्रकरणाने नाशिकसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. सध्या एसआयटीच्या या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.