28 फेब्रुवारीला इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध सुरु झालं. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी आपल्या बंकरमधून बाहेर पडल्याची खात्री पटली, त्याचदिवशी या युद्धाचा शंखनाद झाला. पहिल्याच दिवशी इराणचं सर्वोच्च नेतृत्व संपवून नेतृत्वाची पोकळी निर्माण करण्याची दोन्ही देशांची रणनिती होती. त्यानुसार त्यांना पहिल्याच हल्ल्यात यश आलं. पण इराण काही दिवसात पडेल हा जो त्यांचा मनसुबा होता, तो पूर्ण झाला नाही. कारण इराण अजूनही मोजैक डॉक्ट्रीनच्या युद्ध नितीवर चालत आहे. या युद्धनितीमध्ये नेतृत्व संपलं, तरी सैन्याच्या वेगवेगळ्या शाखा, स्वतंत्र विभाग यांना अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे इराण अजूनही अमेरिका-इस्रायल विरुद्ध उभा आहे, लढत आहे. ट्रम्प-नेतन्याहू यांनी प्रामुख्याने दोन उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन हे युद्ध सुरु केलं होतं.
एक म्हणजे रेजींम चेंज सत्ता बदल आणि दुसरं इराणची अणवस्त्र, मिसाइल निर्मिती क्षमता संपवणं. अमेरिका-इस्रायलला अजूनपर्यंत अधिकृतपणे हे दोन्ही उद्देश पूर्ण करता आलेले नाहीत. हे युद्ध अजून काही दिवस असच चाललं, तर चित्र वेगळ असू शकतं. याचे संकेत आता मिळायला सुरुवात झाली आहे. सध्या भारतीय मीडियामध्ये इराणचं खूप कौतुक सुरु आहे. इराण कसा अमेरिका-इस्रायलसमोर ठामपणे उभा आहे, लढतोय याचं चित्र रंगवलं जातय. अगदी साध उदहारण घ्यायचं झाल्यास रस्त्यात दोन कार चालकांमध्ये भांडण झालं. त्यात एक बलाढ्य, ताकदवान माणूस असेल आणि दुसरा किरकोळ शरीरयष्टीचा असेल. त्यात ताकदवान व्यक्ती जर दुसऱ्याच्या अंगावर धावून गेला. त्याचवेळी किरकोळ देहाचा माणूस ठामपणे उभा राहिला. बलाढ्य माणसाला नडला, तर पाहणाऱ्यांना त्याचं कौतुक वाटतं किंवा बलाढ्य माणसाने हात उचलला तर दुसऱ्या माणसाबद्दल एक सहानुभूती निर्माण होते.
इराणचं कौतुक पण वास्तव तसं आहे का?
ही एक स्वाभाविक मानवी प्रक्रिया आहे. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाकडे पाहताना सर्वसामान्यांची हीच भावना आहे. अमेरिका-इस्रायल हे बलाढ्य देश आणि इराण एक साधा छोटा देश. त्यात अमेरिकेला जगात दादागिरी करत फिरायची सवय. या युद्धाआधी ट्रम्प यांनी टॅरीफ अस्त्राने भारताला चांगलचं हैराण केलेलं. त्यामुळे भारतीय जनमत त्यांच्या विरोधात आधीपासूनच होतं. अमेरिका-इस्रायलच्या तुलनेत इराणची शक्ती म्हणजे फक्त मिसाइल. त्यांच्याकडे स्वत:ची फायटर विमानं सुद्धा नाहीत. त्या तुलनेत अमेरिका-इस्रायलकडे F-15E, F-16, F-18, F-35, बी2 बॉम्बर सारखी घातक विमान. टॉमहॉक मिसाइल्स आणि अजून बरच काही. त्यासमोर इराणचं दुबळेपण लगेच नजरेत भरतं. त्यामुळे इराण, अमेरिकेसमोर अजूनही टिकून आहे, याचं कौतुक वाटणं स्वाभाविक आहे. पण भारतीय मीडियामध्ये इराणच ज्या पद्धतीने कौतुक चाललय. वास्तव तसं आहे का? दुसरी बाजू काय? हे जाणून घेणही गरजेचं आहे.
तर या प्रश्नाचं उत्तर नाही आहे
कुठल्याही युद्धाची दिशा बदलण्याची ताकद एअर फोर्समध्ये आहे. युद्धाला सुरुवात करतानाच अमेरिका-इस्रायलने इराणची एअर डिफेन्स सिस्टिम उद्धवस्त केली. म्हणजे त्यांचे डोळे काढले. आज इराणच्या आकाशावर अमेरिका-इस्रायलचं संपूर्ण वर्चस्व आहे. इराणने तीन-चार अमेरिकेची विमान पाडली म्हणून त्यांनी अमेरिकेवर मात केली असा अर्थ होत नाही. आज अमेरिका-इस्रायलला जेव्हा वाटतं, तेव्हा ते इराणमध्ये वाट्टेल त्या ठिकाणी हल्ला करतात. इराणमध्ये अमेरिका-इस्रायलच्या फायटर जेट्सना रोखण्याची क्षमता आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. मागच्या महिन्याभरापासून अमेरिकी-इस्रायली फायटर जेट्स इराणमध्ये आग ओकत आहेत. तिथे महाप्रचंड असं नुकसान झालं आहे.
इराणने काही वाकड केल्याचं तुम्ही ऐकलं का?
सुरुवातीला दोन्ही देशांनी इराणच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य केलं. नंतर इराणचं बुद्धिस्थळ विद्यापीठं जिथून घातक शस्त्रांच्या निर्मितीचा जन्म होतो, त्यांना लक्ष्य केलं. आज अमेरिकेने इराणचं नौदल संपवून टाकलं आहे. समुद्री युद्धात इराणने अमेरिकेच काही वाकड केल्याचं तुम्ही ऐकलं का? उलट अमेरिकेने इराणची युद्धनौका बुडवली. त्यात इराणच्या शेकडो नौसैनिकांना जलसमाधी मिळाली. फक्त स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये इराणची अजून दादागिरी सुरु आहे. पण कदाचित आज किंवा उद्यापर्यंत त्याचाही फैसला होऊन जाईल.
इस्रायलचा मिसाइल्स हवेतच संपवण्याचा रेट किती?
इराणकडे घातक फायटर जेट्स नसल्यामुळे एअरफोर्स फक्त नावाला होती. त्यांची मुख्य शक्ती होती मिसाइल्स. अनेक वर्ष त्यांनी वेगवेगळ्या रेंजची घातक मिसाइल्स बनवली. त्याचा त्यांनी पुरेपूर वापर केला. इस्रायलवर प्रामुख्याने मिसाइल हल्ले केले. यात व्हिडिओसमध्ये आपण पाहिलं इस्रायलमध्ये काही इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. काही ठिकाणी मिसाइल हल्ल्यात जखमी झाल्यामुळे नागरिकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. 22 मार्चच्या द इकोनॉमिक टाइमसच्या वृत्तानुसार इस्रायलने दिलेल्या आकडेवारीनुसार इस्रायलचा मिसाइल इंटरसेप्शन रेट 92 टक्के आहे. म्हणजे इराणने डागलेली मिसाइल टार्गेटवर पोहोचण्याआधीच हवेतच नष्ट केली जातात. 22 मार्चपर्यंत इराणने 400 बॅलेस्टिक मिसाइल्स डागली. त्यात 92 टक्के मिसाइल्स हवेतच नष्ट झाली म्हणजे तुम्ही विचार करु शकता.
इस्रायलमध्ये कॅमेऱ्यावर बंदी नाही
एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे. इस्रायल, अमेरिकेच्या आखाती देशातील तळांवर जे हल्ले झाले, नुकसान झालं त्याचे फोटो समोर आले. कारण तिथे कॅमेऱ्यावर बंदी नाही. लोकशाही आहे. पण इराणमध्ये लोकशाहीच्या पदराखाली हुकूमशाही कारभार चालतो. अगदी पाकिस्तान सारखा. त्यामुळे तिथे किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, याच नेमकं चित्र समोर आलच नाही. इराणकडे एअर डिफेन्स सिस्टिमच नाहीय. महिन्याभरापासून तिथे हल्ले सुरु आहेत, विचार करा तिथे किती भयानक चित्र असेल.
हीच या युद्धातली इराणची सर्वात मोठी हार
या युद्धातली इराणची सर्वात मोठी हार म्हणजे त्यांच्या भूमीवर अमेरिकी पायलट 24 तासापेक्षा जास्त वेळ असूनही त्याला पकडता आलं नाही. अमेरिका इराण विरोधात जमिनी कारवाई सुरु करणार असं दिसू लागलं. तेव्हा इराणकडून मोठमोठे दावे करण्यात आलं. या आम्ही अमेरिकी सैन्याच्या स्वागताला तयार आहोत. आम्ही अनेक वर्षांपासून याच दिवसाची तयारी करत होतो. पण दोन अमेरिकन सैनिक इराणच्या भूमीत असून इराणला त्यांना पकडता आलं नाही. यातूनच सर्वकाही कळून येतं. युद्धातला हा इराणचा सर्वात मोठा रणनितीक पराभव आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुज आणि आखाती देशांवर हल्ले हेच दोन पत्ते सध्या इराणच्या हातात आहेत.
आता पुढचा नंबर कोणाचा?
इस्रायल-अमेरिकेने वेचून वेचून इराणी कमांडर्स, त्यांच्या महत्वाच्या नेत्यांना टिपलय. हा सिलसिला पुढेही सुरु राहणार. त्यामुळे इराणमध्ये आता त्यांचे लष्करी अधिकारी पद घ्यायला घाबरत आहेत. आता पुढचा नंबर कोणाचा? अशी भिती त्यांच्या मनात आहे. त्यामुळे इराणची लढण्याची ताकद हळूहळू संपत चालली आहे. अमेरिकेने दावा केला की, त्यांनी त्यांच्या बंकर बस्टर्स बॉम्बनी इराणचे मिसाइल साठे, मिसाइल बनवणारे अंडरग्राऊंड कारखाने उद्धवस्त केले. त्यात आता दम वाटू लागलाय. कारण मागच्या चार-पाच दिवसांपासून इराणकडून मिसाइल आणि ड्रोन हल्ल्याचं प्रमाण हळूहळू कमी होत चाललं आहे. इथे अमेरिका-इस्रायलचं कौतुक करणं हा या लेखाचा उद्देश नाही. पण वास्तव परिस्थिती काय ही निदर्शनास आणून देण्याचा केलेला एक छोटासा प्रयत्न.