मुंबई : भारतीय शेअर बाजारात आज सकाळी सुरुवातीला घसरण झाल्याचं दिसून आलं होतं. सेन्सेक्स आणि निफ्टी सलग चौथ्या दिवशी तेजीसह बंद झाले. आयटी शेअरमध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळं बाजार तेजीसह बंद झाला. आज बाजार सुरु झाला तेव्हा सुरुवातीला आखाती देशातील वाढलेला तणाव, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणळा दिलेली धमकी यामुळं गुंतवणूकदार सतर्क झाले होते. मात्र, आयटी स्टॉक्सची जोरदार खरेदी झाल्याचं पाहायला मिळालं.
भारतीय शेअर बाजारात आज बीएसई सेन्सेक्स 509.73 अंक किंवा 0.69 टक्क्यांनी वाढून 74616.58 अंकांवर बंद झाला. निफ्टी 50 निर्देशांक 155.40 अंकांनी किंवा 0.68 टक्क्यांच्या तेजीसह 23123.65 अंकांवर बंद झाला.
भारतीय शेअर बाजारात आजच्या ट्रेडिंगमध्ये आयटी, मेटल आणि रिअल्टीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी दिसून आली. दुसरीकडे फायनान्शिअल्स, बँकिंग आणि ऑटो कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये घसरण झाली आहे. गुंतवणूकदार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण विषयक समितीच्या 8 एप्रिलच्या बैठकीकडे लक्ष ठेवून आहेत.
बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांच्या बाजारमूल्य 429.23 लाख कोटींवर पोहोचलं आहे. तर, सोमवारी बीएसईचं बाजारमूल्य 427.51 लाख कोटींवर होतं. म्हणजेच गुंतवणूकदारांनी आजच्या दिवसात 1.72 लाख कोटींची कमाई केली आहे.
बीएसई सेन्स्केसवर लिस्ट असलेल्या 30 पैकी 19 शेअर तेजीसह बंद झाले. यामध्ये सर्वाधिक तेजी टीसीएसच्या शेअरमध्ये दिसून आली. यानंतर एचसीएल टेक, इन्फोसिस, भारती एअरटेल, सन फार्माच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.
सेन्सेक्सवरील ज्या 11 शेअरमध्ये घसरण झाली त्यात इंडिगो, अदानी पोर्टस, महिंद्रा अँड महिंद्रा, टायटन, ट्रेंटच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली.
दरम्यान बीएसईवर आज तेजी असलेल्यास्टॉक्सची संख्या जास्त आहे. एक्सचेंजवर आज 4381 शेअरमध्ये कारभार झाला. यापैकी 2668 शेअर तेजीसह बंद झाले. तर 1560 शेअरमध्ये घसरण झाली. 153 शेअरमध्ये तेजी किंवा घसरण झाली नाही.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा