लॉकडाऊन अंगाशी… पाकिस्तानमध्ये हाहाकार… कराचीपासून पेशावरपर्यंत जोरदार निदर्शने; पाकचे कंबरडे…
GH News April 07, 2026 11:10 PM

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे पाकिस्तान सरकारची झोप उडाली आहे. पाकिस्तानात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. पाकिस्तानात एनर्जी लॉकडाऊन लावण्यात आले आहे. अशातच आता पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतींमुळे संपूर्ण देशभरात आंदोलक रस्त्यांवर उतरले असल्याचे समोर आले आहे. कराचीपासून पेशावरपर्यंत तीव्र आंदोलनं पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार, सिंध प्रांतात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली आहेत. कराची, हैदराबाद, सुक्कुर आणि जैकोबाबाद यांसारख्या शहरांमध्ये नागरिक आणि राजकीय नेते रस्त्यावर उतरले असून, इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात जोरदार आंदोलन केले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कफन घालून प्रतिकात्मक उपोषण

समोर आलेल्या माहितीनुसार सुक्कुर येथे सिंध युनायटेड पार्टी (SUP) ने प्रेस क्लबसमोर अनोखा आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी कफन परिधान करून प्रतीकात्मक उपोषण केले. यावेळी आंदोलकांना संबोधित करताना SUP चे नेते ऐदान जागीरानी यांनी पेट्रोलच्या किंमतीत 80 रुपयांची कपात केल्याचा दावा फसवा असल्याचे म्हणत सरकारवर निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, अलीकडील आठवड्यांत पेट्रोलच्या किंमतीत 137 रुपये प्रति लिटर इतकी मोठी वाढ करण्यात आली आहे. तसेच महागाईही वाढली आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसली आहे.

तहरीक-ए-इंसाफचे कार्यकर्तेही रस्त्यावर

सिंध युनायटेड पार्टीच्या आंदोलनस्थळीच गोहर खान खोसो यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (PTI) च्या कार्यकर्त्यांनीही आंदोलन केले. खोसो यांनी सांगितले की, इंधनाची किंमत 378 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचली आहे. यामुळे सामान्य जनतेची आर्थिक घडी विस्कळली आहे. सरकारने तात्काळ कर कपात न केल्यास हे आंदोलन देशभर पसरू शकते असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच अवामी तहरीकने तीर चौक ते घंटा घरपर्यंत मोठी रॅली काढली आणि धरणे आंदोलन केले. नेते नूर अहमद कटियार आणि सरवन जतोई यांनी सरकारवर सडकून टीका केली.

दरम्यान, कराचीमध्ये नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशन आणि होम-बेस्ड विमेन वर्कर्स फेडरेशनसह अनेक कामगार संघटनांनी संयुक्त आंदोलन केले. यावेळी इंधन दरवाढ आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थांशी संबंधित धोरणांचा निषेध करण्यात आला. एकंदरीत इराण आणि अमेरिका यांच्यातील यु्द्धामुळे पाकिस्तानात हाहाकार उडाला आहे. आता आगामी काळात संपूर्ण पाकिस्तानातील जनता रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.