मध्ये रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमध्ये उभ्या असलेल्या ट्रेनच्या डब्यांना आग, परिसरात घबराट
Tv9 Marathi April 07, 2026 09:46 PM

मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे वर्कशॉपमधील आवारात उभ्या असलेल्या ट्रेनच्या डब्यांना मंगळवारी दुपारी अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. या आगीत प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. आगीवर तातडीने अग्निशमन यंत्रणांच्या मदतीने नियंत्रण मिळवण्यात आले. या प्रकरणामुळे लोकल सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र धुराचे लोट उटल्याने माटुंगा रेल्वे स्थानक परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते.

माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये लागली आग

मुंबईतील माटुंगा परिसरात रेल्वे वर्कशॉपमध्ये एका एसी कोच्या डब्यांना मंगळवारी दुपारी भीषण आग लागल्याने सर्वत्र घबराट पसरली.ही घटना माटुंगा रेल्वे स्टेशनजवळच असलेल्या मध्य रेल्वेच्या कोच रिपेअर वर्कशॉपमध्ये घडली. या माटुंगा वर्कशॉपमध्ये रेल्वेच्या डब्यांची डागडुजी केली जात असते. प्राथमिक माहितीनुसार, वर्कशॉपच्या आवारात उभ्या असलेल्या एसी कोचमध्ये (एसी ट्रेन) संबंधित उपकरणांमध्ये आग लागल्याचे सांगितले जात आहे. या आगीच्या ज्वाला वेगाने पसरल्या आणि धूर सर्वत्र पसरल्याने या परिसरात घबराट पसरली.

तात्काळ सुरक्षा उपाययोजना

घटनास्थळी उपस्थित असलेले कर्मचारी आणि स्थानिकांमध्ये आग लागल्यानंतर मोठी घबराट पसरली. या आगीची वर्दी मिळताच रेल्वेने अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर माहिती मिळताच, मुंबई अग्निशमन दलाची अनेक वाहने घटनास्थळी दाखल झाली आणि मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आग इतरत्र पसरू नये यासाठी तात्काळ सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आणि आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला. प्राथमिक अहवालानुसार कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी, खबरदारीचा उपाय म्हणून एक वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे.

याआधीही घटना घडल्या

अलिकडेच मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकात यार्डात उभ्या असलेल्या कचरा वाहणाऱ्या लोकल ट्रेनच्या डब्यांना मोठी आग लागल्याची घटना घडली होती. त्या आधीही अनेक वेळा यार्डात उभ्या असलेल्या ट्रेनच्या डब्यांना आगी लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत. या घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी रेल्वेचा निष्काळजीपणा समोर येत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.