Eknath Shinde : विकासाच्या वाटेवरील 'खलनायक हटवून 'नायक' पुढे'; ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्पाला वेग
esakal April 08, 2026 03:45 AM

ठाणे - 'ठाणे बोरवली दुहेरी बोगदा प्रकल्पात अनेक अडथळे आणि स्पीडब्रेकर्स आले, पण आम्ही ते सर्व दूर केले. विकासाच्या वाटेवरील खलनायक हटवून आता ‘नायक’ पुढे आणला आहे,' असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

महायुतीची ताकद आणि नायकाची गती यामुळे हा प्रकल्प वेळेत पूर्ण होणार,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सध्या ठाणे ते बोरिवली प्रवासासाठी 60 ते 120 मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास केवळ 15 मिनिटांत पूर्ण होणार असून अंतर 23 किमीवरून 12 किमीपर्यंत कमी होईल. त्यामुळे इंधनाची बचत होऊन प्रदूषणात मोठी घट होणार आहे आणि घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे शिंदे म्हणाले.

पर्यावरणाचा विचार करत हा बोगदा पूर्णपणे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खाली बांधण्यात येत आहे. जैवविविधतेला कुठलाही धोका होणार नाही यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या असून 11,000 वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. कमी व्हायब्रेशन तंत्रज्ञानाचा वापर करून काम केले जाणार आहे. स्थानिक रहिवाशांच्या चिंता दूर करण्यासाठी बैठका घेण्यात आल्या असून धूळ टाळण्यासाठी dedicated debris corridor, डंप ट्रकसाठी स्वतंत्र मार्ग आणि 7 मीटर रुंद सेवा रस्ते तयार करण्यात येणार आहेत.

या प्रकल्पामुळे नवी मुंबई, कल्याण आणि नाशिककडून येणारी वाहने ठाणे शहराला बायपास करून थेट पुढे जाऊ शकतील. तसेच दहिसर, अंधेरी आणि बोरिवली पश्चिम या भागांशी थेट जोडणी होणार असून भविष्यात पोस्टल रोड आणि कोस्टल रोडशीही या प्रकल्पाचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.