डॉ. मिलिंद नाईक प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला
पंचकोश संकल्पनेच्या आधारे व्यक्तिमत्त्व विकासाचा विचार करताना अन्नमय, प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय या कोशांनंतर येणारा सर्वांत आतला आणि सूक्ष्म स्तर म्हणजे आनंदमय कोश होय. हा कोश समाधान, आत्मानुभूती आणि शाश्वत आनंद यांच्याशी संबंधित आहे. कोणत्याही बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसलेला, अंतर्मनातून अनुभवला जाणारा आनंद हे आनंदमय कोशाचे स्वरूप होय.
आपण अनुभवत असलेला आनंद अनेकदा बाह्य गोष्टींवर आधारित असतो. एखाद्या व्यक्तीला नवी गाडी घेतल्यावर किंवा मोठे पद मिळाल्यावर खूप आनंद होतो; परंतु काही दिवसांनी तो आनंद कमी होतो आणि पुन्हा काहीतरी नवीन मिळवण्याची इच्छा निर्माण होते. त्याचप्रमाणे स्वादिष्ट अन्न खाल्ल्यावर मिळणारा आनंदही काही वेळापुरताच टिकतो. म्हणजेच संपत्ती, यश, प्रतिष्ठा किंवा इंद्रियसुखामुळे मिळणारा आनंद तात्पुरता आणि क्षणभंगुर असतो.
भारतीय संतपरंपरेत आनंदमय अवस्थेचे सुंदर वर्णन आढळते. राष्ट्रसंत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांसारख्या संतांनी अंतःकरणातील समाधान आणि आत्मानुभूती यालाच खरा आनंद मानला आहे. हा आनंद बाह्य सुखांपेक्षा श्रेष्ठ असून तो स्थिर आणि चिरंतन असतो.
राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या एका सुंदर अभंगात खऱ्या आनंदाविषयी म्हटले आहे,
आनंदाचे डोही आनंद तरंग।
आनंदचि अंग आनंदाचे॥
जिथे पाहावे तिथे आनंदच आहे. मन शुद्ध आणि शांत होते, तेव्हा सर्वत्र आनंदाची अनुभूती येते. आनंद हा बाह्य वस्तूंमध्ये नसून आपल्या अंतरंगातच असतो.
विज्ञानमय कोशाच्या परिपक्वतेनंतर मनुष्याला शाश्वत-अशाश्वत यांतील भेद समजतो, तेव्हा त्याचे मन हळूहळू स्थिर आणि निर्मळ होत जाते. शाश्वत तत्त्वांची जाणीव होऊ लागते. मनातील अस्थिरता, तणाव, इच्छा-आकांक्षा आणि द्वेषभाव कमी होत जातात आणि अंतःकरणात शांतता व समाधान निर्माण होते. सुख-दुःखांकडे तटस्थपणे पाहण्याची क्षमता विकसित होते. हीच अवस्था आनंदमय कोशाची प्रारंभिक अनुभूती मानली जाते. पुढे सर्व सृष्टीतील एकात्मता जाणवू लागते आणि सर्वभूतहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा निर्माण होते; यांतून सेवाभाव विकसित होतो. अतिशय विकसित अवस्थेत आनंदमय कोशामध्ये दुःखनिरपेक्ष, शाश्वत आनंदाचा अनुभव प्राप्त होतो.
आनंदमय कोशाचा विकास साधण्यासाठी ध्यान, आत्मचिंतन, साधना, सेवा आणि मूल्याधिष्ठित जीवन यांना विशेष महत्त्व आहे. ध्यानामुळे मन शांत व एकाग्र होते, तर आत्मचिंतनामुळे स्वतःच्या विचारांचा आणि भावनांचा सखोल अभ्यास करता येतो. निःस्वार्थ सेवा, कृतज्ञता, करुणा आणि सहानुभूती यांसारख्या मूल्यांचा अंगीकार केल्यास अंतर्मनातील शुद्धता वाढते आणि आनंदाची अनुभूती अधिक गहिरी होते. म्हणूनच शिक्षणामध्ये अशाप्रकारच्या आध्यात्मिकता विकसित करणाऱ्या उपक्रमांचा अंतर्भाव केला पाहिजे.
आधुनिक शैक्षणिक मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर आनंदमय कोशाचा संबंध मानसिक स्वास्थ्य, समाधान, सकारात्मकता आणि निरामयता या संकल्पनांशी जोडता येतो. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोन, तणावाचे संतुलन, कृतज्ञतेची भावना आणि जीवनातील अर्थपूर्णता यामुळे व्यक्ती अधिक आनंदी आणि समाधानी राहते. याच संदर्भात हॉवर्ड गार्डनर यांनी मांडलेल्या अस्तित्ववादी बुद्धिमत्ता या संकल्पनेचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. ही बुद्धिमत्ता माणसाला ‘मी कोण आहे,’ ‘जीवनाचा उद्देश काय आहे,’ ‘खरा आनंद कुठे आहे’... अशा मूलभूत आणि तत्त्वज्ञानात्मक प्रश्नांचा शोध घेण्यास प्रवृत्त करते. तसेच अब्राहम मॅस्लो यांनी मानवी गरजांच्या श्रेणीमध्ये सर्वोच्च स्तरावर आत्म-वास्तविकता मांडली आहे. या अवस्थेत व्यक्ती स्वतःची खरी ओळख शोधते आणि जीवन अधिक अर्थपूर्ण बनवते. केवळ बाह्य यश नव्हे, तर अंतर्गत समाधान, सर्जनशीलता, मूल्यनिष्ठा आणि समाजासाठी योगदान देण्याची वृत्ती येथे प्रकर्षाने दिसून येते. अशा प्रकारचे आत्मचिंतन आणि अस्तित्वाचा शोध हीच आनंदमय कोशाच्या अनुभूतीची दिशा दर्शवणारी प्रक्रिया आहे. ही संकल्पना केवळ आध्यात्मिक नसून आधुनिक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाची असल्याचे स्पष्ट होते.