आधी 12 गुन्हे; आता आणखी 11 तक्रारी, घरात मृत्यू होईल अशी भीती घालायचा अन् 'ऊर्जा, विशेष पूजा, शरीरशांती'च्या नावाखाली अशोक खरात नको ते करायचा
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा April 08, 2026 11:13 AM

नाशिक: नाशिकमधील स्वयंघोषित कॅप्टन आणि भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या अटकेनंतर नाशिक पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्पलाईनवर तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडत आहे. खरातने (Ashok Kharat) केवळ लोकांची आर्थिक फसवणूकच केली नाही, तर 'ऊर्जा आणि शांती'च्या नावाखाली महिलांचे अमानुष लैंगिक शोषण केल्याचे आता उघड होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आणखी ११ पीडित महिलांनी पुढे येत खरातवर (Ashok Kharat) लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहेत. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आता प्रचंड वाढली आहे. या सर्व तक्रारींची चौकशी शहानिशा करून एसआयटी पुढील कारवाई करणार आहे.(Ashok Kharat)

Ashok Kharat: तुझ्या पतीचा किंवा मुलाचा मृत्यू होईल

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात हा महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवाचे भीती दाखवत असे. "तुझ्या पतीचा किंवा मुलाचा मृत्यू होईल," अशी भीती घालून तो महिलांचे मानसिक खच्चीकरण करायचा. त्यानंतर 'ऊर्जा, विशेष पूजा आणि शरीरशांती' मिळवून देण्याच्या बहाण्याने तो या महिलांचे शारीरिक शोषण करत असे. अनेक महिलांनी आपली हक्काची मालमत्ता आणि जमीनही खरातने दहशतीखाली बळकावल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

Ashok Kharat: खरातविरुद्ध एकूण १२ गुन्हे दाखल

नाशिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) तैनात केले आहे. हेल्पलाइनवर येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची शहानिशा हे पथक करत असून, मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे. आतापर्यंत भोंदू अशोक खरातविरुद्ध एकूण १२ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये महिला अत्याचाराचे ८, तर फसवणुकीचे ४ गुन्हे असून त्यांचा सखोल तपास सुरू आहे.

Ashok Kharat: पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार

दरम्यान, खरातची पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस या प्रकरणातील अधिक धागेदोरे शोधण्यासाठी आणि बळकावलेली मालमत्ता हस्तगत करण्यासाठी खरातच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. खरातच्या अटकेनंतर आता अनेक पीडित नागरिक आणि महिला आता समोर येत असल्याने येत्या काळात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४ हजार ६५० अश्लील लिंक डिलीट

भोंदू अशोक खरातवर ६० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. ३० साक्षीदार तपासले असून त्यांची साक्ष महत्त्वाची ठरेल, अशी माहिती एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. खरातशी संबंधित ४,६५० अश्लील लिंक सायबर टिमने डिलीट केल्या, तर सोशल मीडियावरील ४५० अकाउंट देखील कायमची डिलीट केली आहेत. खरातच्या मालमत्तेसंबंधी कागपदपत्रे ईडीकडे सोपविण्यात आल्याचेही सातपुते यांनी सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.