मराठीत पहिल्यांदाच अनुभवा ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’; हॉरर सिनेमा ‘घबाडकुंड’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क April 08, 2026 07:13 PM

Ghabadkund Marathi Movie Release Date: यवतमाळचा होतकरू आणि प्रयोगशील दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील पुन्हा एकदा आपल्या हटके शैलीत प्रेक्षकांसमोर नवा प्रोजेक्ट सादर करण्यास सज्ज झाला आहे.  विविध शॉर्ट फिल्म्स तसेच वेब सिरीजमधून दिग्दर्शकानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ‘अल्याड पल्याड’च्या घवघवीत यशानंतर आता ‘घबाडकुंड’ या नव्या चित्रपटातून थरारक अनुभव देण्याचा त्यानं निर्धार केला आहे.  कल्पनेच्या पलीकडचं ‘युनिव्हर्स’ मोठ्या पडद्यावर साकारण्याचा धाडसी प्रयत्न दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटीलने केला आहे. त्याच्या या नव्या संकल्पनेला आयकॉन दी स्टाईल’ संस्थेचे निर्माते डॉ.रसिक कदम  यांची साथ लाभली आहे.  दिग्दर्शकाचा आगामी हॉरर 'घबाडकुंड' हा चित्रपट येत्या 19 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

युवा दिग्दर्शकाची नवी कल्पना, ‘घबाडकुंड’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला (Ghabadkund Marathi Movie)

प्रीतम एस. के. पाटील या दिग्दर्शकाने आतापर्यंत ‘खिचिक’,‘डॉक्टर डॉक्टर’, ‘ढिशक्यांव’ यांसारख्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केलंय.  आता नव्या तंत्राचा वापर करुन लवकरच प्रीतम पाटील एक नवा प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन रहस्य, थरार आणि वेगळ्या संकल्पनांवर आधारित कथा सादर करण्याची त्याची हातोटी लक्षवेधी ठरणार आहे. ‘अल्याड पल्याड’ सारख्या रहस्यमय थरारपटातून त्यानं मराठी सिनेमात कमी हाताळल्या जाणाऱ्या हॉरर-थ्रिलर प्रकाराला नवं रूप दिलं. मराठी प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळं आणि धाडसी सादर करण्याचा त्याचा प्रयत्न सातत्याने दिसून येतो.

मराठीत पहिल्यांदाच ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’  (Marathi Cinematic Universe)

हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’ची संकल्पना मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरली असली, तरी मराठीत अशा प्रकारचा प्रयत्न अत्यंत दुर्मीळ आहे. प्रितम पाटील याच्या संकल्पनेमुळे मराठी प्रेक्षकांना एक वेगळा, थरारक आणि तांत्रिकदृष्ट्या समृद्ध अनुभव मिळणार, यात शंका नाही. भय, थरार आणि रहस्याचा जबरदस्त मिलाफ असलेला ‘घबाडकुंड’ हा चित्रपट सादरीकरणाच्या दृष्टीने प्रेक्षकांसाठी एक खास ‘स्पेशल ट्रीट’ ठरणार आहे. 

या चित्रपटाबाबत युवा दिग्दर्शक प्रीतम एस.के.पाटील म्हणतो, “मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन प्रयोग करण्याची परंपरा खूप समृद्ध आहे. निर्माते आणि दिग्दर्शक नेहमीच वेगळं काहीतरी सादर करण्याचा प्रयत्न करतात आणि ते समर्थपणे साकारही करतात. मात्र, मनोरंजनासोबत थरारक आणि मसालेदार अनुभवासाठी प्रेक्षक अनेकदा हिंदी चित्रपटांकडे वळताना दिसतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन मराठी चित्रपटांना हॉररचा एक वेगळा तडका देण्याचा मी प्रयत्न केला आहे. या चित्रपटातून हॉरर या जॉनरला हाताळताना अॅक्शन, इमोशन आणि ड्रामा यांचा संगम साधला आहे. एकंदरीत हा चित्रपट प्रेक्षकांसाठी संपूर्ण मनोरंजनाचं पॅकेज ठरेल, असा मला विश्वास आहे. ”  ‘घबाडकुंड’मधून प्रेक्षकांना एक वेगळाच थरार अनुभवायला मिळणार आहे, यात शंका नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

FIR दाखल होताच मोबाईलमध्ये सगळ्यात पॉवरफुल नंबर शोधला; फोन करताच काय घडलं?, समय रैनाने सगळं सांगितलं!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.