मुंबई: अमेरिका आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी करण्यात आली आहे. याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारांवर दिसून आला आहे. भारतीय शेअर बाजारातदेखील आज गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. सेन्सेक्स आणि निफ्टी 4 टक्क्यांनी वधारले.
सेन्सेक्स निर्देशांक आज 2946 अंकांनी म्हणजेच 3.95 टक्क्यांनी वधारून 77562.90 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 50 निर्देशांक 874 अंकांनी वाढून 23997.35 वर पोहोचला आहे.
शेअर बाजारात निफ्टी मिडकॅप 100 आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांकात 4 टक्क्यांची वाढ झाली आहे. निफ्टी बँक, निफ्टी रिअल्टी आणि निफ्टी ऑटो निर्देशांक 7 टक्क्यांनी वधारले. तर इंडिया विक्स निर्देशांक 20 च्या खाली आला.
बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 429 लाख कोटींवरुन 17 लाख कोटींनी वाढून 446 लाख कोटींवर पोहोचलं म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 17 लाख कोटींची वाढ झाली आहे.
भारतीय शेअर बाजारामधील तेजीमागं एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यात झालेली दोन आठवड्यांची शस्त्रसंधी होय. इराणनं या दोन आठवड्यांच्या काळात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना मार्गक्रमण करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीमुळं क्रूड ऑईलच्या दरात मोठी घसरण झाली आहे. क्रूड ऑईलचे दर 95 डॉलर प्रति बॅरलवर आले आहेत.याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला. आता अमेरिका आणि इराण यांच्यातील पुढील चर्चा इस्लामाबादमध्ये होणार आहे.
भारत मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑईल खरेदी करत असल्यानं क्रूड ऑईलचे दर कमी झाल्यानं भारतीयांना दिलासा मिळणार आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपया भक्क झाल्यानं देखील भारताला फायदा होणार आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 50 पैशांनी मजबूत होऊन 92.56 रुपये डॉलरवर पोहोचला.
सकारात्मक जागतिक संकेतांमुळं भारतीय शेअर बाजारावर तेजी दिसून आली. अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आल्यानं आशियाई बाजारांवर सकारात्मक परिणाम दिसून आला. कोरिया, जपानच्या शेअर बाजारात 6 टक्के वाढ दिसून आली.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट आज जाहीर केला. रेपो रेट 5.25 टक्के कायम ठेवत आरबीआयनं कर्जदारांना दिलासा दिला असला तरी महागाईचं मोठं आव्हान कायम असणार आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा