पुणे : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी करण्यात आली आहे. भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. त्याचप्रमाणे सोने आणि चांदीच्या दरात वाढ झालीय. या सर्व घडामोडींवर पुण्यातील सोन्याचे व्यापारी फत्तेचंद्र रांका यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले पंधरा दिवसांसाठी जरी युद्धविराम जाहीर झाला असला, तरी आजही सोन्याच्या किमतींमध्ये वाढ दिसून येत आहे. हा दिलासा केवळ तात्पुरता असून युद्ध पूर्णपणे थांबलेले नाही.
फत्तेचंद्र रांका पुढं म्हणाले की सोनं बाहेरुन आयात केलं जातं सर्व देश सोनं खरेदी करत आहेत. सोन्याचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सोन्याचे भाव स्थिर राहणं अशक्य आहे. काल युद्ध थांबलं असलं तरी सोन्याचे दर 3000 रुपयांनी वाढले आहे. युद्ध पूर्णपणे थांबल्यास सोन्याचे दर कमी होण्याची दाट शक्यता आहे, असं रांका यांनी म्हटलं.
हवाई सीमा पूर्णपणे उघडली गेली तर सोन्याचे दर कमी होऊ शकतात. सोन्याचे दर 1 लाख 45 हजार ते 1 लाख 50 हजारांदरम्यान राहतील, असं फत्तेचंद्र रांका म्हणाले. सोन्याचा हंगाम नव्हता, मागणी कमी होती, लग्नसराई कमी होती. परीक्षा असतात, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात मागणी कमी असते, पुरवठा जास्त असतो त्यामुळं सोन्याचे दर कमी होतात. युद्ध जर नाही थांबलं तर सोन्याचे दर वाढू शकतात, असंही फत्तेचंद्र रांका म्हणाले.
युद्धस्थिती पूर्णपणे निवळल्याशिवाय सोन्याच्या किमती कमी होण्याची शक्यता कमी आहे. सध्या सोने मोठ्या प्रमाणात इतर देशांकडून आयात केले जाते. मात्र विविध निर्बंधांमुळे या आयातीवर परिणाम झाला असून त्याचा थेट परिणाम किमतींवर होत आहे.
सध्याच्या वाढत्या दरांमुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.सोन्याचे दर आणखी वाढतील की कमी होतील, याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे सोन्यासोबतच चांदीच्या विक्रीवरही त्याचा परिणाम होताना दिसत आहे, अशी माहिती फत्तेचंद्र रांका यांनी दिली.
सोनं ज्यांना घ्यायचं आहे, लग्नसराई आहे, त्यांना सोनं खरेदी करावं लागतंचं. नफा मिळवण्यासाठी सोनं खरेदी करणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे. सोने हे एक असेट असल्यानं ते खरेदी केलं जातं.फत्तेचंद्र राका म्हणाले की भारताकडे जमिनीत सोनं 50 हजार टन आहे. ते बाहेर काढल्यास सोन्याचे दर परवडणारे राहू शकतात.भारताला जमिनीतील सोनं काढता आलं नाही तर आयात केलेलं सोनं स्वस्तात मिळणं कठीण राहील, असं फत्तेचंद्र रांका म्हणाले.