परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
पंकज क्षीरसागर, एबीपी माझा April 08, 2026 10:43 PM

परभणी : राज्यात गेल्या काही महिन्यात एसीबीने (ACB) प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडवून दिली असून लाचखोर (Bribe) अधिकारी, कर्मचाऱ्यांना फास आवळला आहे. त्यामुळे, गेल्या काही महिन्यात चक्क शिपायांपासून ते तहसीलदारपर्यंतच्या अधिकाऱ्यांस बेड्या ठोकल्या आहेत. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये लाचखोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आता सिद्धच झालं आहे. कारण, आज एकाच दिवशी दोन लाचखोर अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यामध्ये अडकले आहेत. त्यामुळे, जिल्ह्याच्या (Parbhani) प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आता तरी सरकारी कार्यालयात पैस दिल्याशिवाय काम होईल की नाही, असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. 

परभणीच्या पालम येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अधीक्षक डॉ. रमेश खंदारे यांचा रुग्णालयातील कापड स्वच्छता कंत्राटदार यांच्याबरोबर व्यवहार होता, त्याच अनुषंगाने त्यांनी त्याला 50 हजारांची लाच मागितली. त्यानुसार, कंत्राट दाराकडून 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना एसीबीच्या एका टीमने अटक केली. मात्र, लाच लुचपत विभागाच्या टीमने पकडल्यानंतर हे पैसे माझे नाहीत, म्हणून खंदारे यांनी ते पैसे फेकून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, एसीबीने त्यांना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. 

दुसरीकडे परभणीच्या पाथरी तालुक्यातील भूमी अभिलेख मधील वरिष्ठ लिपिक बिडकर यांनी चुकीची मोजणी करून नकाशा बनवला होता, तीच मोजणी पुन्हा करुन अचूक नकाशा बनवून देण्यासाठी संबंधित नागरिकाकडे आठ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानुसार, तक्रारदाराकडून लिपिक बिडकर यांच्याकडून लाचेची रक्कम आठ हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. दरम्यान, दोन्ही प्रकरणात तपास केला जात आहे.

मस्साजोगच्या सरपंच पदासाठी संतोष देशमुखांच्या पत्नी उद्या अर्ज भरणार; निवडणूक होणार की बिनविरोध?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.