Sanjay Raut Full Press | विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल करत आहात, पण अजित पवार प्रकरणावर… संजय राऊ स्पष्टच बोलले
Tv9 Marathi April 09, 2026 05:45 PM

बारामतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी महाराष्ट्रात गुन्हा दाखल करावा आणि व्ही. के. सिंग यांना अटक करावी, अशी मागणी केली. सध्या महाराष्ट्रात गुन्हा नोंदवला नसला तरी कर्नाटकमध्ये झिरो एफआयआर नोंदवलेला आहे. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असताना काँग्रेसनेही अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसची भूमिका योग्य ठरवत भाजपवर टीका केली. राऊत यांनी म्हटले की, “मुख्यमंत्र्यांनीही सत्य शोधून चौकशी करण्याची ग्वाही दिली आहे, पण त्यासाठी प्रथम एफआयआर नोंदवणे आवश्यक आहे. तुम्ही विमान कंपनीवर गुन्हा दाखल करण्यास तयार नाहीत. ही मागणी रोहित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार करत आहेत.”

पुढे संजय राऊत म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष विरोधकांवर खरे-खोटे गुन्हे दाखल करतो. भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात आणि अपघातासंदर्भात, कर नाही तर डर कशाला? तुम्हाला त्यामध्ये खरोखरच गुन्हा दाखल करायचा आहे ना, तुम्हाला भीती नसेल तर गुन्हा दाखल करा. तुम्ही का लांब पळत आहेत. विरोधकांवर खरे-खोटे धडाधड गुन्हे दाखल करत आहात. पण तुमचा एक जवळचा सहकारी, राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री म्हणतायेत त्याप्रमाणे जीवाभावाचा मित्र आणि सहकारी गमावला असे म्हणतायेत ना.” त्या जीवाभावाच्या सहकारी आणि मित्राच्या संशयास्पद मृत्यूसंदर्भात तुम्ही गुन्हा का दाखल करत नाहीत, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.