मोठी बातमी, काँग्रेसची बारामती विधानसभा पोट निवडणुकीतून माघार
Tv9 Marathi April 09, 2026 06:45 PM

काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून अखेर माघार घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ यांनी उमेदवारी मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. उमेदवारी मागे घेताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजपसोबत आहे, यावर त्यांनी टीका केली.

राष्ट्रवादीअजित पवारगटाने भाजप सारख्या विषारी, विखारी पक्षासोबत राहू नये. सत्तेसाठी लाचार होऊ नये. अजितदादा एक मोठा नेता होता. हा अपघात, घातपात यामध्ये गुन्ह्याची नोंद होत नाही. हे महाराष्ट्राच दुर्देव आहे. गुन्हा दाखल होत नाही. सरकार जरुर काहीतरी लपवा छपवी करत आहे असा आरोप या प्रसंगी हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. हर्षवर्धन सपकाळ यांनी हा निर्णय जाहीर करताना काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी यासाठी त्यांच्याशी कोणी-कोणी संपर्क साधला याची सुद्धा माहिती दिली. आज सकाळीच आमदार रोहित पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना भेटून काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी अशी विनंती केली होती. त्याशिवाय शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी सुद्धा काँग्रेसने उमेदवार मागे घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांची टीम

“एक वैचारिक भूमिका म्हणून भाजपच्या विरोधात बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढत आहोत आणि त्यातच निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांची टीम बनला आहे. भाजपचा राजकीय विरोधक म्हणून आम्ही ही निवडणूक लढत होतो. आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज काँग्रेस मधून भरला आहे. आमच्या उमेदवाराने बारामती मधे प्रचार सुरू केला होता. अजित पवार हे राज्याचे नेते आहेत आणि त्यांच्यासोबत काम केल आहे. त्यामुळे या भावनिक भूमिकेमुळे आम्ही निवडणुकीतून माघार घेण्यात यावी अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली होती” असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

सुनेत्रा पवार यांनी फोन केला

“सुनेत्रा पवार यांनी माझ्याशी फोनवर देखील संवाद साधला आणि त्यांनी विनंती केली की काँग्रेसने पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी. काँग्रेसच्या राज्यातील विविध नेत्यांशी यासंदर्भात महायुतीच्या नेत्यांनी संपर्क साधला होता. आज सकाळी देखील रोहित पवार यांनी भेट घेतली आणि पार्थ पवार यांच्या वक्तव्याचा संदर्भात दिलगिरी व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळे यांनी देखील फोनवरून माझ्याशी संवाद साधला. सुनेत्रा पवार यांनी देखील दिल्लीत आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी भेट घेतली” असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.