मनोरंजक तथ्ये: घरगुती गॅस सिलेंडर आणि पेट्रोल टँकर गोलाकार का असतात?
Marathi April 09, 2026 08:25 PM

आपल्या रोजच्या आयुष्यात आपण अनेक गोष्टी पाहतो, पण त्यांच्या मागचं विज्ञान समजून घेण्याचा विचार फार कमी वेळा करतो. स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडर असो किंवा रस्त्यावरून धावणारा पेट्रोल टँकर या दोन्हींचा आकार एकसारखाच म्हणजे गोलाकार का असतो, हा प्रश्न अनेकांना पडतो. हा केवळ सोयीसाठी घेतलेला निर्णय नसून, त्यामागे मजबूत वैज्ञानिक कारणं आणि सुरक्षेचा विचार दडलेला आहे. (why gas cylinder and petrol tanker are round shape)

गोलाकार आकारामागचं मुख्य कारण म्हणजे दाबाचं संतुलन. गॅस किंवा द्रव पदार्थ जेव्हा बंद भांड्यात साठवले जातात, तेव्हा आतून मोठ्या प्रमाणात दाब निर्माण होतो. गोलाकार आकारामुळे हा दाब सर्व दिशांना समान प्रमाणात पसरतो. कोणत्याही एका भागावर अतिरिक्त ताण येत नाही. त्यामुळे सिलेंडर अधिक सुरक्षित आणि टिकाऊ राहतो.

चौकोनी आकार का टाळला जातो?
जर गॅस सिलेंडर चौकोनी किंवा कोनीय आकारात तयार केला, तर समस्या निर्माण होऊ शकते. कोपऱ्यांवर दाब जास्त प्रमाणात केंद्रित होऊन त्या भागात भेगा पडण्याची किंवा गळती होण्याची शक्यता वाढते. गंभीर परिस्थितीत स्फोटाचा धोका देखील वाढू शकतो. म्हणूनच, गोलाकार रचनेत कोपरे नसल्यामुळे हा धोका कमी होतो.

कमी जोड, जास्त मजबुती
सिलेंडर तयार करताना त्यामध्ये जितके कमी जोड (joints) असतील, तितकी त्याची ताकद जास्त असते. चौकोनी संरचनेत अनेक जोड द्यावे लागतात आणि तो जोड हा संभाव्य कमकुवत भाग असतो. गोल सिलेंडरमध्ये कमी वेल्डिंग असल्यामुळे गळतीची शक्यता कमी होते

पेट्रोल टँकरही गोलच का असतात?
रस्त्यावर दिसणारे पेट्रोल किंवा गॅस टँकरदेखील गोलाकार असतात आणि त्यामागेही तेच विज्ञान आहे.

1. संतुलन राखण्यासाठी
टँकर वळण घेताना आतला द्रव हलतो गोल आकारामुळे द्रव सहज फिरतो आणि संतुलन राखलं जातं तर टँकर उलटण्याचा ही धोका कमी होतो.

2. तापमान आणि दाब सहन करण्यासाठी
उष्णतेमुळे गॅस किंवा द्रवाचा दाब वाढतो. गोलाकार रचना हा वाढलेला दाब सुरक्षितपणे सहन करू शकते.

वाहतुकीसाठीही सोयीस्कर
गोल सिलेंडर फक्त सुरक्षितच नाहीत, तर वापरण्यासही सोपे असतात.ते सहज घरंगळत नेता येतात. उचलणं आणि हलवणं सोपं होतं आणि मजुरांचा श्रम कमी होतो.

गॅस सिलेंडर आणि पेट्रोल टँकरचा गोलाकार आकार हा केवळ डिझाइनचा भाग नाही, तर तो एक विचारपूर्वक घेतलेला वैज्ञानिक निर्णय आहे. दाबाचं संतुलन, मजबूत रचना आणि सुरक्षित वाहतूक या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच हा आकार निवडला गेला आहे. त्यामुळे पुढच्या वेळी सिलेंडर पाहिलात, तर त्यामागचं हे विज्ञान नक्की आठवा.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.