गेल्या काही काळापासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दिवसाढवळ्या खून-मारामारीच्या घटना घडताना दिसत आहेत. अशातच आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणीचा तिच्याच प्रियकराने गळा चिरून खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यात प्रियकर तरूणीचा गळा चिरताना दिसत आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त होत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
प्रियकराने तरुणीचा गळा चिरलासमोर आलेल्या माहितीनुसार, संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड येथील गणपती मंदिराशेजारी असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही थरारक घटना घडली. पूजा सुदाम गावंडे या महिला नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त होत्या. त्याच वेळी तिचा प्रियकर सत्यम रावसाहेब गावंडे हा पंपावर आला. दोघांमध्ये काही वेळ वाद झाला आणि संतापाच्या भरात सत्यमने आपल्या जवळील चाकूने पूजाच्या गळ्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या पूजाचा जागीच मृत्यू झाला.
महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवरभरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासात प्रेमप्रकरणातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, फरार आरोपी सत्यम गावंडेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. भरवस्तीत आणि सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या निर्घृण हत्येमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, राज्यात याआधीही अशाप्रकारच्या घटना समोर आलेल्या आहेत. सध्या नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास सध्या एसआयटीच्या पथकाकडून सुरू आहे. अनेक महिलांनी या प्रकरणी तक्रारी दिल्यानंतर खरातचे अनेक कारनामे समोर आले आहेत.