मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई April 09, 2026 11:13 PM

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-3 म्हणजेच ‘ॲक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक मोठे गिफ्ट दिले आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि खिशाला परवडणारा करण्यासाठी विशेष सवलतीच्या पासची घोषणा केली आहे. 'डिजिटल मोबिलिटी'ला चालना देण्यासाठी हे सर्व पास नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) वर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा खर्च आता 25 टक्क्यांनी कमी!

शाळा-महाविद्यालयाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मेट्रोने मोठा आधार दिला आहे. इयत्ता 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे सवलत लागू असेल

45 आणि 60 ट्रिप पासवर 25 टक्के थेट सवलत
 
वैधता: 30 दिवस.
   
यामुळे विद्यार्थ्यांचा दरमहा प्रवासाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होणार असून सुरक्षित आणि वातानुकूलित प्रवासाची खात्री मिळणार आहे.

पर्यटकांच्या सेवेसाठी ‘अनलिमिटेड’ मेट्रो राईड

मुंबई फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यकांसाठी मेट्रोने खास 'टुरिस्ट पास' सादर केले आहेत. एकदा पास काढला की कितीही वेळा प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे:
 
1 दिवसाचा पास (अमर्यादित प्रवास): फक्त ₹280
3 दिवसांचा पास (अमर्यादित प्रवास): फक्त ₹700

दिव्यांग आणि नियमित प्रवाशांनाही लाभ

केवळ विद्यार्थीच नव्हे, तर दिव्यांग प्रवाशांनाही 45 आणि 60 ट्रिप पासवर 25 टक्के सवलत कायम ठेवण्यात आली आहे. तसेच, नियमित नोकरदार वर्गासाठी MetroConnect3 ॲपवर 45 ट्रिपसाठी 10 टक्के आणि 60 ट्रिपसाठी 15 टक्के सवलत आता NCMC कार्डच्या माध्यमातून घेता येईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.