पाण्यासाठी शेतकऱ्यांची वणवण
वैतरणा नदीवर नागनाथ येथे बंधारा बांधण्याची मागणी
वाडा, ता. ९ (बातमीदार) : वाडा तालुक्याला पंचनद्यांचे वरदान लाभले आहे. तानसा, वैतरणा, पिंजाळ, देहर्जे व गारगावी अशा पाच नद्या तालुक्यातून वाहतात. मात्र, योग्य नियोजनाअभावी या नद्यांचा लाभ शेतकऱ्यांना होत नाही. अशात खानिवली परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी वैतरणा नदीवरील नागनाथ येथे बंधारा बांधण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
वैतरणा नदीकिनारी आंबिस्ते गावाच्या हद्दीत नागनाथ हे देवस्थान आहे. या देवस्थानच्या जवळून वैतरणा नदी गेली असून, हे देवस्थान उंच टेकडीवर आहे. नदीचा भाग खोल असून, येथे मे-जून या अखेरच्या क्षणीही मुबलक पाणीसाठा असतो. या ठिकाणी एक मोठा बंधारा बांधल्यास त्याचा फायदा खानिवली परिसरातील हजारो नागरिक, शेतकरी व उद्योजकांना होऊ शकतो. या बंधाऱ्यामुळे हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येऊन हा परिसर हिरवागार होऊ शकतो. सर्व खेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना, सिंचन योजना राबवून हा प्रश्न मार्गी लागू शकतो. त्यामुळे या ठिकाणी बंधारा बांधण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
नागनाथ येथे बंधारा झाल्यास या परिसरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळून त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येईल. त्याचबरोबर सुमारे तीन ते चार हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. येथील शेती हिरवीगार होऊन शेतकऱ्यांना दुबार पिके घेता येतील. त्याचबरोबर भाजीपाला, फुलशेती, फळशेती ही शेतकरी करू शकतील. युवकांना रोजगार निर्माण होईल व ते शेतीकडे वळतील. त्याचबरोबर आजुबाजुच्या २० गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येईल. पाण्याच्या पातळीत वाढ होईल. कूपनलिका, विहिरीचे पाणीही वाढण्यास त्यामुळे मदत होईल. शिवाय दुबार शेतीही शेतकऱ्यांना करता येईल. त्याचबरोबर या परिसरातील उद्योजकांनाही या पाण्याचा उपयोग होऊन त्यांचाही पाण्याच्या प्रश्न संपुष्टात येईल.
लाभक्षेत्रात येणारी गावे व जमिनीचे क्षेत्र
========================
आंबिस्ते खुर्द २२९ हेक्टर
आंबिस्ते बु. ५८९ हेक्टर
खानिवली- १८९ हेक्टर
आब्जे ३६६ हेक्टर
वैतरणा नगर २७२ हेक्टर
निचोळे २७३ हेक्टर
भावेघर १८३ हेक्टर
बिलोशी, वसुरी, खरीवली, पालसई, खुपरी, बिलावली, देवघर, गौरापूर, बोरांडा, घोडमाळ, पिंपळास, चनेमान, खरीवली, टकली, मांडा, भोपीवली, आपटी, देवळी या गावांचा पाण्याच्या प्रश्न संपुष्टात येईल.
------------------
चांगल्या बंधाऱ्यांची गरज
या तालुक्यातील शेतकऱ्यांचा विकास करायचा असेल, तर येथील सर्व नद्यांवर १० किलोमीटर अंतरावर गळती न होणारे चांगले बंधारे बांधले पाहिजेत. या बंधाऱ्यांच्या पाण्यावर परिसरातील सर्व खेड्यांमध्ये उपसा जलसिंचन योजना राबवून जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणली पाहिजे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
----------------
कमी खर्चात जास्त गावांना फायदा
नागनाथ येथे बंधारा बांधून हे पाणी वसुरी येथील नाल्यात सोडल्यास सुमारे १० ते १५ किमी अंतरावर या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. त्यासाठी कालवा काढण्याची गरज पडणार नाही. पिण्याच्या पाण्यासाठी संयुक्त पाणी योजना राबवल्यास त्याचा लाभ पंचवीसहून अधिक गावांना होऊ शकतो. तसेच हेच पाणी उद्योजकांनाही देता येईल. त्यामुळे उद्योजकांच्या पाण्याचा प्रश्न मिटेल.
------------
नागनाथ येथे बंधारा व्हावा यासाठी मी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. या बंधाऱ्यामुळे परिसरातील २५ गावांतील लोकांचा पिण्याच्या पाण्याचा, शेतकऱ्यांचा सिंचनाचा व उद्योजकांचा पाण्याच्या प्रश्न संपुष्टात येईल. या बंधाऱ्यामुळे एक प्रकारे विकासाला गती मिळेल. त्यामुळे येथे बंधारा होणे जरूरीचे आहे. यासंदर्भात मी शेतकऱ्यांसह पालकमंत्र्यांची भेट घेऊन या महत्त्वाच्या विषयावर लक्ष वेधणार आहे.
- सुरेश पवार, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष