बारामतीत शेवटच्यादिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात
जयदीप भगत, बारामती April 09, 2026 07:43 PM

पुणे : राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती (Baramati) विधानसभा पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसने (Congress) आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अर्ज माघारी घेत असल्याची घोषणा केली. यावेळी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी फोन करुन विनंती केल्याची तसेच आमदार रोहित पवार यांनी देखील सकाळी सकाळीच भेट घेतल्याची माहिती दिली. तसेच, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील सूचना केल्याचं उल्लेख करत सपकाळ यांनी काँग्रेसने निवडणुकीत माघार घेतल्याचं सांगितलं. यावेळी, त्यांनी पार्थ पवारांच्या वक्तव्यावरुन त्यांचे कान देखील टोचले. 

बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 30 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. शेवटच्या दिवशी अर्ज माघारी घेण्याची वेळ संपली आहे. तत्पूर्वी, काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांनीही आपला अर्ज माघारी घेतला. त्यामुळे, बारामती विधानसभा मतदारसंघातील अर्ज दाखल केलेल्या 53 पैकी एकूण 30 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. मात्र, बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले आणि करुणा मुंडे- शर्मा यांचा अर्ज कायम आहेत. त्यामुळे, बारामती पोटनिवडणुकी एकूण 23 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, गुरुवारी सहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले होते, त्यानंतर आज 24 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे, एकूण, 30 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. 

दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीसाठी अभिजीत बिचुकले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तसेच करुणा शर्मा यांनी देखील अर्ज भरला होता. त्यामुळे, काँग्रेसने माघार घेतल्यानंतर या दोघांच्या अर्जाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोघेही बारामतीत फिरकलेच नाहीत. त्यामुळे, त्यांचे अर्ज कायम राहिले असून आता, पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असल्याचं निश्चित झालं आहे. बारामतीत 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 

बारामती आणि राहुरीचा पोटनिवडणूक कार्यक्रम

निवडणुकीची अधिसूचना जारी :  30 मार्च 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : 6 एप्रिल 2026
अर्जांची छाननी : 7 एप्रिल 2026
अर्ज मागे घेण्याची मुदत : 9 एप्रिल 2026
मतदानाची तारीख : 23 एप्रिल 2026
मतमोजणी : 4 मे 2026
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : 6 मे 2026

निवडणुकीसाठी भाजपकडून 40 स्टार प्रचारकांची नावे

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ही यादी निवडणूक आयुक्तांना सादर करण्यात आली आहे. या स्टार प्रचारकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, नितीन गडकरी, शिव प्रकाश, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील या बड्या नेत्यांची नावे आहेत.  

Byelection: राहुरीत शेवटच्यादिवशी अनेक उमेदवारांची माघार, 7 उमेदवार रिंगणात; शिवसेनेतील बंडखोरी कायम

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.