सर्वात कमी वयात (13 वर्ष) आयपीएल कॉन्ट्रॅक्ट मिळवणारा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याची गेल्या वर्षापासून क्रिकेट विश्वात फक्त चर्चाच नाही तर दबदबा आणि तडाखाही पाहायला मिळतोय. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी आयपीएलचं कॉन्ट्रॅक्ट मिळवणाऱ्या वैभवने 18 व्या आणि पदार्पणातील मोसमात (IPL 2025) तडाखेदार शतक झळकावलं. वैभवने वयाच्या 14 व्या वर्षी शतक झळकावलं. वैभव यासह आयपीएल स्पर्धेत सर्वात वेगवान शतक करणारा पहिला युवा भारतीय फलंदाज ठरला. वैभवने तेव्हापासून सात्याने विविध वयोगटातील स्पर्धेत चमकदार कामगिरी केलीय. वैभवने अनेक गोलंदाजांची धुलाई करुन खोऱ्याने धावा करत असंख्य विक्रम आपल्या नावावर केले आहेत. मात्र हा युवा फलंदाज जसप्रीत बुमराह सारख्या टॉपच्या गोलंदाजासमोर कशी कामगिरी करतो याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. त्यामुळे बुमराह-वैभव या बॅटलकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र वैभव इथेही सरस ठरला.
वैभव सूर्यवंशी याने ‘दुनिया हिले देंगे हम’ म्हणणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या बुमराहसोबत इतर गोलंदाजांचीही धुलाई केली. राजस्थान रॉयल्सच्या या युवा फलंदाजाने 7 एप्रिलला मुंबई इंडियन्सच्या 3 गोलंदाजांना पहिल्या बॉलवर सिक्स ठोकत आपली छाप सोडली. त्यामुळे आता वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी पूर्णपणे फिट झालाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सिनिअर टीम इंडियात खेळण्यासाठी किमान वयाची अट ही 15 वर्ष इतकी आहे.
वैभव अवघ्या काही दिवसांपूर्वी 27 मार्च रोजी 15 वर्षांचा झाला. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या वैभवने आयसीसीच्या नियमानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्यासाठीच्या अटीची पूर्तता केली आहे. या निमित्ताने टीव्ही 9 मराठीने वैभव सूर्यवंशी याचे प्रशिक्षक मनीष ओझा यांच्याशी चर्चा केली. मनीष यांनी टीव्ही9 सोबत बोलताना वैभव टीम इंडियात कुणाची जागा घेईल? यासह इतर अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. या निमित्ताने मनीष ओझा काय म्हणाले हे जाणून घेऊयात. तसेच वैभवने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांविरुद्ध किती धावा केल्या हे समजून घेऊयात.
वैभव मुंबई विरुद्ध पावसाने प्रभावित झालेल्या 11 षटकांच्या सामन्यात एकूण 14 चेंडू खेळला. वैभवने या दरम्यान एकूण 4 गोलंदाजांचा सामना केला. वैभवने या 14 चेंडूत बुमराह,बोल्टसारख्या गोलंदाजांची हवा काढली. वैभवने 14 बॉलमध्ये 39 रन्स केल्या. वैभवने या 39 पैकी 34 धावा फक्त 6 चेंडूत केल्या. वैभवने या खेळीत 5 षटकार आणि 1 चौकार लगावला. वैभवने जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट आणि शार्दुल ठाकुर या 3 गोलंदाजांना त्यांच्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर सिक्स लगावला.
वैभवने बुमराहच्या पहिल्या आणि सामन्यातील दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर खणखणीत सिक्स लगावला. वैभवने अशाप्रकारे बुमराह विरुद्धची लढत जिंकली. वैभवने बुमराहच्या पहिल्याच ओव्हरमध्ये एकूण 2 षटकारांसह 14 धावा केल्या. वैभवने बुमराहप्रमाणे बोल्ट (2.4) आणि शार्दूल ठाकुर (4.1) यांनाही त्यांच्या कोट्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये सिक्स लगावला. मुंबईच्या 5 गोलंदाजांनी सुरुवातीला बॉलिंग केली. वैभवने त्यापैकी 4 गोलंदाजांचा सामना केला. मात्र त्यापैकी एकानेही स्टंपसमोर बॉल टाकण्याचं धाडस केलं नाही. वैभवने मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई करुन यशस्वी जैस्वाल याच्यासह पहिल्या 5 ओव्हरमध्ये 80 रन्सची सलामी भागीदारी केली.
वैभवची विस्फोटक बॅटिंग पलटणसाठी डोकेदुखी ठरत होती. शार्दुलने वैभवला आऊट करत त्याच्या खेळीला ब्रेक लावला. वैभवने 14 चेंडूत 39 धावा केल्या. मात्र वैभव या 14 चेंडूत 4 गोलंदाजांविरुद्ध यशस्वी ठरला.
वैभवने या 14 चेंडूंच्या खेळीत 4 गोलंदाजांचा सामना केला. वैभवने शार्दुल, बुमराह, बोल्ट आणि हार्दिक पंड्या यांच्या बॉलिंगचा सामना केला. वैभवने शार्दुल आणि बुमराह विरुद्ध प्रत्येकी 5 चेंडूंचा सामना केला आणि 10 पेक्षा अधिक धावा केल्या. वैभवने शार्दुल विरुद्ध 17 आणि बुमराहच्या बॉलिंगवर 13 रन्स मिळवल्या. तर वैभवने हार्दिक आणि बोल्ट विरुद्ध प्रत्येकी 2-2 बॉल खेळला. वैभवने बोल्ट विरुद्ध 7 धावा केल्या. तर हार्दिकने वैभवला फक्त 2 धावाच करुन दिल्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील या स्टार गोलंदाजांविरुद्ध केलेल्या कामगिरीनंतर पुन्हा एकदा वैभवची चर्चा पाहायला मिळत आहे. वैभवमधील प्रतिभा पाहून तो टीम इंडियासाठी केव्हा डेब्यू करतोय याची चाहत्यांना प्रतिक्षा आहे. मात्र वैभवला संधी मिळालीच तर त्याला कुणाच्या जागी खेळवता येणार? याबाबत युवा फलंदाजाच्या कोचने काय म्हटलं हे समजून घेऊयात.
“वैभवला टीम इंडियात घेण्याची योग्य वेळ आली आहे. बीसीसीआयनेही वैभवला घेण्यासाठी वाट पाहू नये. तसेच वैभव आयपीएलनंतर होणाऱ्या टी 20 मालिकेत टीम इंडियात असेल”, असं युवा खेळाडूचे प्रशिक्षक मनिष ओझा यांनी टीव्ही 9 सोबत बोलताना ठासून सांगितलं.
“वैभव सूर्यवंशी आयर्लंड विरुद्ध खेळेल. तसेच वैभव त्यानंतर होणाऱ्या झिंबाब्वे दौऱ्यासाठीही जाईल. तसेच तो अभिषेक शर्मा याची जागा घेईल”, असा विश्वास मनोज झा यांनी आपल्या शिष्याबाबत व्यक्त केला. त्यामुळे आता मनोज झा यांचा हा विश्वास कितपत खरा ठरतो हे बीसीसीआयकडून आयर्लंड दौऱ्यसाठी टीम इंडियाची घोषणा केल्यानंतरच स्पष्ट होईल.
वैभवने आयपीएल स्पर्धेत 2025 साली राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण केलंय. वैभवने आयपीएल कारकीर्दीत आतापर्यंत 10 सामन्यांमध्ये 37.4 च्या सरासरीने आणि 218.72 अशा स्ट्राईक रेटने एकूण 374 रन्स केल्या आहेत. वैभवने या दरम्यान 1 शतक आणि 2 अर्धशतकं झळकावली आहेत. वैभवने या दरम्यान चौकारांपेक्षा जास्त षटकार लगावले आहेत. वैभवने 35 षटकार आणि 28 चौकार लगावले आहेत. तसेच वैभवने इंडिया अंडर 19, इंडिया अंडर 19 बी, इंडिया ए आणि बिहारचं प्रतिनिधित्व केलं आहे.
तसेच वैभवने 8 फर्स्ट क्लास, 8 लिस्ट ए आणि 21 टी 20 सामने खेळले आहेत. वैभवने टी 20 क्रिकेटमध्ये 21 डावांत 823 धावा केल्या आहेत. वैभवने टी 20 क्रिकेटमध्ये 1 शतक लगावलं आहे. वैभवने 8 फर्स्ट क्लास सामन्यांमधील 12 डावांत 1 अर्धशतकासह 207 रन्स केल्या आहेत. तसेच वैभवने 8 लिस्ट ए सामन्यांत 353 धावा केल्या आहेत.