Player Of The Match Mukul Choudhary Credits Faith, Family & Hard Work: राजस्थानच्या छोट्याशा गावातून आलेल्या २१ वर्षीय मुकूल चौधरीने कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डनवर अविस्मरणीय खेळी केली. लखनौ सुपर जायंट्सवरील पराभवाचे सावट गडद झालेले असताना मुकुलने आशेचा किरण दाखवला.. त्याने कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना अशक्यप्राय विजय खेचून आणला. सामन्यानंतर त्याने आपल्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल व वडिलांच्या स्वप्नाबद्दल सांगितले.
२७ चेंडूंत २ चौकार व ७ खणखणीत षटकार मारून सामनावीर ठरलेला मुकुल म्हणाला,"माझ्या वडिलांनी त्यांच्या लग्नाआधीपासूनच, त्यांच्या मुलाने क्रिकेट खेळावे हे स्वप्न पाहिले होते. सुरुवातीला आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. १२-१३ वर्षांचा असताना खेळायला सुरुवात केली. झुंझुनूमध्ये फारशा अकादमी नव्हत्या आणि मग मी जयपूरला गेलो. ट्वेंटी-२० क्रिकेटचे झपाट्याने होत असलेली वाढ पाहून मी गुडगावला गेलो आणि तिथे ३-४ महिने राहिलो." ( Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...)
समालोचक हर्षा भोगले त्याची मुलाखत घेत होते, त्यांनी विचारले की, तू यशस्वी होशील, हे त्याला किंवा त्याच्या वडिलांना कधी कळले? त्यावर तो म्हणाला,"माझे वडील सांगतात की, मी उत्तर प्रदेशविरुद्ध १९ वर्षांखालील सामना होता, तो कमी धावसंख्येचा सामना होता, पण मी धावा केल्या आणि तेव्हाच त्यांना कळले की मी खूप मोठा खेळाडू होईन. आजचा हा रात्रीच्या लाईट्समध्ये खेळलेला मी दुसराच सामना होता, नेहमी प्रमाणे दडपण होते. पण, देवाने मला ही संधी दिली आणि सतत प्रयत्न करत राहण्याच्या जिद्दीमुळे मी हे आज करू शकलो. मी याकडे दडपण घेण्याऐवजी एक संधी म्हणून पाहतो. शेवटपर्यंत खेळण्याची माझी योजना होती आणि मला माहित होते की जर मी शेवटपर्यंत फलंदाजी केली तर संघाला जिंकवून देऊ शकेन."
मुकुलने आज ७ षटकार मारले आणि यापैकी आवडता षटकार कोणता असे विचारल्यावर तो म्हणाला," पहिला षटकार. आजच्या आधी मी एकही षटकार मारला नव्हता, त्यामुळे तो खास होता. २ चेंडूंत ७ धावांची गरज असताना मला माहित होतं की एक चेंडू माझ्या टप्प्यात येईल आणि मला फक्त एक षटकार मारायचा आहे. मी लहानपणापासून जेव्हापासून खेळतोय, तेव्हापासून मी चेंडू भिरकावण्याचं काम करतोय.. मी ज्या गावातून येतोय तिथे जास्त तरुण भारतीय सैन्यात जातात.. ते तिथे देशासाठी लढत आहेत आणि मी क्रिकेटच्या मैदानावर संघासाठी लढतोय...