हडपसर : काळे बोराटे नगर येथील नागरी वन उद्यानामध्ये आज पहाटे अज्ञात व्यक्तींनी आग लावून पॅगोडा जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नागरिकांना बसण्यासाठी आणि विश्रांतीसाठी उभारण्यात आलेला हा पॅगोडा पूर्णतः जळून खाक झाला आहे. परिसरातील नागरिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
उद्यानात फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने संबंधित प्रशासनाला कळविले. तसेच, उपस्थितांनी स्वत: तातडीने पाणी मारून आग आटोक्यात आणली. या प्रकारामुळे सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
या घटनेमागील अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. तसेच, उद्यानात सुरक्षाव्यवस्था वाढवावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशीही जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, याबाबत विभागीय वन अधिकारी सुभाष वरक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली असल्याचे सांगितले.
"वनविद्यानाची ही जागा वनविभागाची असून नागरिकांनी एकत्र येत उद्यान विकसित केले आहे. पालिकेच्या माध्यमातून येथे पक्क्या भिंतीचे कुंपण केले आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधीतून आतमध्ये पॅगोडा उभे केले आहेत. मात्र, हे उद्यान सुरक्षित राहिले नाही. त्यामुळे वनविभागाने ही जागा देखभालीसाठी पालिकेकडे द्यावी, अशी मागणी यापूर्वी केली आहे. आजही आमची ही मागणी आहे. वनविभागाने त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे."
उज्वला जंगले, नगरसेविका