शिवतीर्थाच्या बालेकिल्ल्यातील सर्व फॅन (पक्षी : छताचे पंखे) ऑनवर फिरत होते. मार्चच्या झळा नुकत्याच सुरू झाल्या होत्या. गवाक्षाच्या दिशेने राजमुख करोन उभ्या असलेल्या पाठमोऱ्या साहेबांनी धीरगंभीर आवाजात म्हटले, ‘‘पुनश्च हरि ॐ!’’
दशदिशात आवाज घुमला. शिवाजी पार्काच्या सभोवताल फालतू टाइमपास करणारी कबुतरे (अतिशय लोचट जात! बंद करा ते कबुतरखाने!!) अस्मानात उडाली. पुन्हा बसली. मॉर्निंग वॉकच्या नावाखाली मिसळ, घावणे, साबुदाणा वडा आदी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी आलेले आरोग्यदक्ष नागरिक चपापले. पुन्हा वडा खाऊ लागले.
‘‘आमच्या अष्टप्रधान मंडळाला तातडीनं सांगावा धाडा, म्हणावं, जल्द अज जल्द गडावर पावतें व्हावे. मोठी मसलत करावयाची आहे!’’ साहेबांनी पाठमोऱ्या अवस्थेतच फर्मान सोडले. कदीम महाराष्ट्रसैनिकांनी चपळाईने कमरेचा शेला उपसून काढून रापणीला मासे धरावेत, तसे ते फर्मानातील शब्द टिपले. सगळे तालेवार सरदार ‘शिवतीर्था’च्या पायथ्याशीच टाइमपास करीत उभे होते.
‘‘आता नवनिर्माण किती येळा करायचं?,’’ एका भाबड्या सरदाराने सवाल केला.
‘‘इराणचं असंल! त्यांना गरज हाय!,’’ दुसऱ्याने आपल्या मगदुराप्रमाणे उत्तर दिले.
‘‘या! साहेब कशापायी इराणला जातील? आपण फार्फार्तर पुणं किंवा नाशिक...उगीच कोण त्या इराणला जाईल?’’ तिसऱ्याने शक्यता खोडून काढली. परंतु, फर्मान मिळताच ते तातडीने वरच्या मजल्यावर गेले...
‘‘काय जहाले महाराज? आगळीक घडली का?’’ बाळाजीपंत नांदगावकरांनी अदबीने विचारले. हे बाळाजीपंत कधीही बोलले तरी अदबीनेच बोलतात. सवय एकेकाची!!
‘‘महाराष्ट्राचे नवनिर्माण कसे होणार? या चिंतेने आमच्या डोळियांस डोळा लागत नाही...,’’ साहेब अजूनही पाठमोरेच उभे होते. ते सामोरे होवो नयेत, ऐसे साऱ्यांचेच मत होते, हा भाग अलाहिदा. पण मसलत मोठी असणार, म्हणूनच साहेबांनी पाठमोरी सुरवात केली असणार!
‘‘हुईल हुईल! अजून टाइम गेलेला नाही, तुम्ही फक्त आदेश द्या साहेब, चोवीस तासात करून टाकू नवनिर्माण!’’ नितीनाजी सरदेसाईंनी (कधी नव्हेत तो) आक्रमक पवित्रा घेतला.
‘‘साहेब, मला वाटतं की मधला हा मनोमीलनाचा एपिसोड झाला ना, तिथं टीआरपी घसरला आपला,’’ संदीपाजी परखड बोलण्याबद्दल प्रसिद्धच होते. त्यावर कुणीही काहीही बोलले नाही.
‘‘खामोश! ती काळाची गरज होती...,’’ साहेब थोड्या वेळाने उद्गारले. तो विषय तिथंच संपला.
‘‘भाकरी फिरवावी लागेल, साहेब! हल्ली सगळ्या पार्ट्या निवडणुका झाल्या की भाकऱ्या फिरवायला घेतात,’’ बाळाजीपंतांनी पोक्त सल्ला दिला.
‘‘लाख बोलिलात, बाळाजीपंत, लाख बोलिलात!’’ साहेब उत्तेजित झाले. आपण जे काही बोललो, ते लाखमोलाचे होते, यावर बाळाजीपंतांचाच विश्वास बसेना. पण तरीही ते खुदकन हसले.
‘‘तुम्ही म्हणाल तसं करू साहेब!’’ संदीपाजींनी येका गुडघ्यावर वीरासनात बैसोन आण घेतली.
‘‘आपल्या दौलतीत बरेच फेरबदल करावयाचा आमचा इरादा आहे,’’ साहेबांनी शंभर नंबरी सवाल टाकला. याचे उत्तर कोणाकडेच नव्हते.
‘‘म्हंजे नेमके काय करावे? आपले सर्व प्रकार करून झाले आहेत, फेरबदल करायला कुणी फारसं उरलंदेखील नाही, नव्या नियुक्त्याच कराव्या लागतील आता! गेल्या इलेक्शनमध्ये...,’’ कुण्या एकनिष्ठ सरदाराने प्रामाणिक भावना व्यक्त केली.
‘‘झाले ते झाले! आता आपण एकदिलाने कामाला लागू! महाराष्ट्रातील समस्यांसाठी लढा देणारी संघटना म्हणून आपली ओळख निर्माण होऊ द्या!,’’ पाठमोरे साहेब सामोरे होत्साते विजयी मुद्रेने म्हणाले. सवंगड्यांचे बाहू फुरफुरले.
‘‘तुम्ही कार्यक्रम सांगा, आम्ही जान निछावर करू, साहेब!’’ एक महाराष्ट्र सैनिक भारावून म्हणाला.
‘‘कार्यक्रम काय असणार? तोच नवनिर्माणाचा! पुनश्च हरि ॐ...,’’ साहेब म्हणाले.
...महाराष्ट्र सैनिकांनी नव्याने मान डोलावली!