जीवनरस आकर्षित करतो व सर्व पेशींना सजीवता देतो तो ‘प्राण’. प्राणाचे आवाहन केल्यावर तो वायूच्या माध्यमातून आत येतो- हाच प्राणवायू. प्राणतत्त्व येण्यासाठी वायूमध्ये एक विशिष्ट तत्त्व असावे लागते, जेणेकरून ‘प्राणा’चे आकर्षण करता येईल. त्यामुळे प्राणवायूचे खूप महत्त्व आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर झाडे कापल्यामुळे प्राणवायूची कमतरता तयार झाली आहे. सध्या आपल्यापुढे प्रश्नचिन्ह आहे की रोग का वाढत आहेत? सगळीकडे प्राणवायूची कमतरता झाल्यामुळे रोग वाढत आहेत.
आपण सगळ्यांनी विचार करणे आवश्यक आहे की आपण आयुष्यात एक तरी झाड लावले आहे का? काही नाही तर निदान दूर्वा लावण्यापासून सुरुवात करावी. सरकार म्हणत आहे म्हणून नव्हे किंवा आपल्या घरासमोर हिरवळ हवी म्हणून नव्हे तर कार्बन-डाय-ऑक्साईडवर नियंत्रण ठेवून आपल्याला प्राणवायूचे आवाहन करायचे असेल तर आपल्या आसपास झाडे झुडपे हवीतच. यामुळे प्राणांवरचे सर्व कार्य झाडा-झुडपांनी वेढलेल्या आश्रमांमध्ये झाल्याचे दिसते. पूर्वीच्या ऋषिमुनींना टोलेजंग इमारती बांधता येत नव्हत्या असे नाही. ते तर सगळे मोठमोठे सिद्ध लोक होते. मनात आणले तर ते राजवाडा उभा करू शकतील अशा सिद्धी त्यांच्याकडे होत्या, पण ते पर्णकुटीत राहून जास्तीत जास्ती प्राणशक्ती आकर्षित करण्याच्या मागे होते. आपण सध्या काँक्रिटची जंगले असा शब्द अनेकदा वापरतो, त्यात आपल्याला दोन गोष्टी नडतात, एक म्हणजे या काँक्रिटच्या जंगलांमुळे आपल्यापर्यंत वाऱ्याची झुळूक सोडा पण टेलिफोनचा सिग्नलही आत येत नाही, तेथे प्राणशक्ती कोठून येणार? प्राणशक्ती सर्वव्यापी असली तरी तिचे आकर्षण करण्यासाठी कठिण होते. आपण या गोष्टीचा कधीच विचार केलेले नसतो पण इतक्या दाटीवाटीत राहिल्यावर प्रत्येक मनुष्याच्या वाटेला आलेले आकाशतत्त्व कमी होते. नळाला पाणी आले नाही की आपण खूप आरडाओरडा करतो, आपल्याला पुरेसे अन्न मिळाले नाही म्हणजे आपल्या वाटेला पुरेसे पृथ्वीतत्त्व आले नाही तर आपण जागरूक राहतो पण आपल्या वाटेला किती आकाशतत्त्व आले आहे याचा आपण विचार करत नाही. आकाशतत्त्व प्राणाला आकर्षित करते. प्रत्येकाने खेड्यात जाऊन राहावे, पुन्हा लोकसंख्येचे विकेंद्रीकरण व्हावे असे म्हणता येणार नाही पण जोपर्यंत आपण रोज १०-१५ मिनिटे झाडे, वेली, हिरवळ असलेल्या जागी थोडेसे मोकळ्यावर बसत नाही तोपर्यंत आपण प्राणशक्ती कशी काय आकर्षित करू शकणार? रामायणात कौसल्येला पुत्रप्राप्ती होत नव्हती तेव्हा ती लतामंडपात जाऊन बसली व तेथे तिने आता काय करायला हवे याचे चिंतन केले. ज्याला प्राणांचे आवाहन करायचे आहे, आरोग्य मिळावायचे आहे त्याने रोज १०-१५ मिनिटे झाडांच्या सान्निध्यात बसणे आवश्यक आहे.
शरीरात प्राणशक्तीला वावरू द्यायचे असले, तिला शरीरात काम करू द्यायचे असले तर त्यासाठी वीर्यधातू आवश्यक असतो. हा आयुर्वेदातल्या सप्तधातूंपैकी एक आहे. रस म्हणजे आपण जे अन्न खातो त्यापासून तयार होणारा रस. यानंतर येते रक्त, मांस, मेद, हाडे, हाडांच्या मध्ये वा नसा ज्याच्यापासून बनलेल्या आहेत तो मज्जाधातू, मज्जेच्या नंतर येते वीर्य. हे वीर्य म्हणजे आपल्या शरीररूपी गाडीचे पेट्रोल आहे. प्राणाची शक्ती वीर्यात साठवली जाते व नंतर ती आपण घेऊ शकतो. वीर्य असले तरच प्राणशक्तीचा आपल्याला उपयोग होतो. त्यामुळे वीर्य वाढवणे भाग आहे. त्यासाठी सकस आहार घेणे आवश्यक असते. बाजारात अनेक प्रकारचे, अनेक भावांचे तांदूळ असतात, कुठल्या तांदळात किती वीर्य आहे हे मात्र अनेकांना माहीत नसते. आपण अनेकदा स्वस्तातल्या गोष्टी विकत घेऊन काटकसर करण्याचा प्रयत्न करतो. पण स्वस्तातल्या गोष्टीत वीर्य किती आहे हे आपण पाहात नाही. ज्या वस्तूत वीर्य अधिक असते त्या वस्तू बहुधा अधिक महाग असतात, कारण पैसे त्यातील वीर्यशक्तीसाठीच असतात. सध्या एक तंत्र विकसित झालेले आहे, ज्यामुळे प्रत्येक वस्तूतील कस काढून घेतला जातो. त्यामुळे कस काढून घेतलेल्या लवंगा, केशर, दालचिनी वगैरे अनेक गोष्टी सध्या बाजारात स्वस्तात विकत मिळतात. आपण बाहेर भेळ, पाणी-पुरी अशा गोष्टी खातो, पण त्यात वीर्य किती असते हा खरोखर संशोधनाचा विषय आहे. पण बाहेर जाऊन छान पराठा खातो असे कोणी म्हणत नाही. तेव्हा आपल्याला कोणते अन्न पचेल, आपल्या प्रकृतीला कोणते अन्न योग्य आहे, त्यात वीर्य आहे का असे न पाहता खादडंती केली की शरीरात वीर्याचा अभाव, पर्यायाने प्राणाचा अभाव होणे अपरिहार्य आहे. प्राणाचा अभाव म्हणजे रोग. शरीरात प्राणशक्ती वाढल्याशिवाय आपल्याला रोग बरा करता येणार नाही. ऑस्टिओपोरोसिस, संधिवात, शरीर पोखरून टाकणारा मधुमेह, कर्करोग यासारख्या गंभीर रोगांना बरे करायला केवळ प्राणाचाच उपयोग होऊ शकतो. या रोगांसाठी आयुर्वेदाने सुचविलेल्या औषधांमध्ये मुख्यतः वीर्यवर्धनाचीचॉ औषधे असतात. वीर्य वाढले की हृदय बरे होते, वीर्य वाढले की कर्करोग बरा होतो. तेव्हा आपल्याला खाण्यातून वीर्यवर्धन होणे अत्यावश्यक आहे व त्यातूनच प्राणशक्ती व जीवन मिळते.
आपल्या परंपरेत मुलाला जन्मतः सोने व मध चाटवायला सांगितलेले आहे. सोन्याचे महत्त्व आपण समजून घेऊ या. सोन्याच्या पत्र्यावर सूर्यप्रकाश पडल्यावर वीज आकर्षित करता येते तसेच शरीरात घेतलेले वा शरीरावर घातलेले सुवर्ण प्राणशक्तीचे आवाहन करेल यात काही आश्र्चर्य वाटण्यासारखे नाही. म्हणून सुवर्णयुक्त पंचामृताचे सेवन वा शरीरावर सोन्याचे दागिने घालण्याचा उपयोग होतो. एखादे चांदीचे भांडे प्रत्येकाच्या घरात असते, पण ते लॉकरमध्ये न ठेवता रोज वापरले तर आपल्याला त्याचा उपयोग होतो. चांदीच्या भांड्यात पाणी भरून ठेवणे, चांदीच्या भांड्याने पाणी व दूध पिणे फायदेकारक असते. चांदीच्या भांड्यात दूध तापवले तर थोडी थोडी चांदी दुधात विरघळते, पण चांदीच्या भांड्यात पाणी ठेवल्याने चांदी विरघळत नाही. असे सुवर्ण-चांदीसंस्कारित दूध, पाणी घेतल्याने प्राणशक्तीचे आकर्षण व्हायला मदत होते. प्राणशक्तीचे आकर्षण करून रोग बरे करणे हा स्वस्तात स्वस्त व मस्त उपाय आहे. रोग खूप त्रास देत असला तर वैद्यांकडे जाऊन काही दिवस औषध घेऊन थोडा आराम मिळवावा पण रोग बरा करणारा मुख्य असतो ‘प्राण’.
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)