तेलंगणा उच्च न्यायालयाकडून 1 आठवड्याचा अंतरिम जामीन
न्यूज एजन्सी/ हैदराबाद
आसाममध्ये नोंद एका गुन्ह्याप्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांना तेलंगणा उच्च न्यायालयाने एक आठवड्याचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पवन खेडा यांना एक आठवड्याची मुदत संबंधित न्यायालयासमोर हजर राहत नियमित जामिनासाठी अर्ज करण्यासाठी दिली जात असल्याचे न्यायाधीश सुजाना कलासिकम यांनी सांगितले आहे. यादरम्यान पवन खेडा यांना काही अटींसह अटकेपासून दिलासा मिळणार आहे.
आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांच्या पत्नी रिंकी भुइयां शर्मा यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांप्रकरणी पवन खेडा यांच्याविरोधात आसाम पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडे अनेक पासपोर्ट आणि विदेशात संपत्ती असून त्याची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात देण्यात आली नसल्याचा दावा पवन खेडा यांनी 5 एप्रिल रोजी केला होता.
चौकशीसाठी पोहोचले होते पोलीस
याप्रकरणी आसाम पोलीस हे दिल्ली पोलिसांसोबत मिळून पवन खेडा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले असता तेथे ते आढळून आले नव्हते. तर स्वत:वरील कारवाई टाळण्यासाठी पवन खेडा यांनी तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी न्यायालयात स्वत:चा वास्तव्य पत्ता हैदराबाद नमूद करत अटकेच्या स्थितीत दिलासा देण्याची मागणी केली होती. हैदराबाद येथे पवन खेडा यांचे घर असल्याचा दावा करण्यात येत आहे.
आरोप करणे अंगलट
पवन खेडा यांनी एका पत्रकार परिषदेत हेमंत विश्व शर्मा यांच्या पत्नींकडे तीन वेगवेगळ्या देशांचे पासपोर्ट असल्याचा दावा केला होता. तसेच याप्रकरणी पुरावे आपल्याकडे असल्याचे म्हणत खेडा यांनी याला स्वतंत्र भारताच्या राजकारणातील सर्वात मोठे प्रकरण संबोधले होते.