Sanju Samson emotional statement after record breaking innings :संजू सॅमसनने चेपॉकचे मैदान आज गाजवले... इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात संजूने शतक झळकावले आणि या पर्वातील तो पहिला शतकवीर ठरला. या शतकानंतर त्याने एका व्यक्तिला खास विनंती केली.“सर, तुम्ही माझ्यासाठी लकी आहात... कृपया प्रत्येक सामन्यापूर्वी भेटा,” असे म्हणत सॅमसनने भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूकडे हसत विनंती केली.
सामन्यानंतर संजूची मुलाखत समालोचक रवी शास्त्रीयांनी घेतली. संजू त्यांना म्हणाला, "हो सर, तुमच्यामुळे खूप छान वाटतंय, धन्यवाद. मला वाटतं तुम्हीच माझ्यासाठी 'लकी' व्यक्ती आहात; त्यामुळे कृपया प्रत्येक सामन्याला या सर, मला खूप आनंद होईल. खरं सांगायचं तर, मला असं वाटतं की तुम्ही कितीही चांगल्या 'फॉर्म'मध्ये असलात किंवा आपल्या देशासाठी कितीही सामने जिंकले असले, तरी एखाद-दुसऱ्या अपयशामुळे तुमच्या मनात नक्कीच अनेक शंका निर्माण होतात. पण मला फक्त पुन्हा माझ्या 'मूलभूत गोष्टींकडे' वळायचं होतं, स्वतःवर विश्वास ठेवायचा होता आणि माझ्या धावा करण्याच्या नेहमीच्या पद्धतीवरच ठाम राहायचं होतं."
CSK vs DC Live : १९ चेंडूंत ८४ धावा अन् शतक... संजू सॅमसनची ऐतिहासिक कामगिरी; MS Dhoni चा विक्रम मोडला, ९ मोठे पराक्रम"मनात अनेक विचार आले; सुरुवातीलाच आक्रमक खेळावं की आपली रणनीती बदलावी, असा प्रश्न पडला. पण जे तंत्र माझ्यासाठी उपयुक्त ठरत होतं, त्यावरच ठाम राहायचं मी ठरवलं आणि सुदैवाने आज त्याचा खूपच सुंदर परिणाम दिसून आला. मला वाटतं, ही खेळपट्टी खूपच चांगली आहे. आज इतकी सुंदर खेळपट्टी तयार केल्याबद्दल मी 'क्युरेटर'चे आभार मानतो. त्यामुळे आशा आहे की, आम्ही ही धावसंख्या नक्कीच यशस्वीपणे राखू शकू," असा विश्वासही संजूने व्यक्त केला.
संजूने आयुष म्हात्रेचे कौतुक केले. त्याच्यासोबत त्याने दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली. तो म्हणाला," आयुषसोबत माझी भागीदारी खूपच छान झाली. मला वाटतं, तो एक अत्यंत गुणवान युवा खेळाडू आहे. त्याच्यासोबत फलंदाजी करताना मला खरोखरच खूप आनंद मिळाला. आपण फलकावर जास्तीत जास्त मोठी धावसंख्या कशी उभारू शकतो, हा विचार मनात होता. त्यामुळे, फक्त खेळत राहायचं आणि धावा करत राहायचं, हीच आमची रणनीती होती. आम्ही फारशा विकेट्स गमावल्या नाहीत. आमच्याकडे फलंदाजीसाठी येणारा क्रम अजून खूप मोठा होता."
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सच्या २१२ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने ६६ धावांत ३ विकेट्स गमावल्या. लोकेश राहुल व पथूम निसंका यांनी पाच षटकांत संघाला ६१ धावा उभारून दिल्या होत्या. पण, खलील अहमदने पहिला धक्का दिला. त्यनंतर अंशुल कंबोज व गुरजपनीत सिंग यांनी विकेट्स घेतल्या.