अवघा महाराष्ट्र सुन्न, एकाच दिवशी 2 जिल्ह्यात अपघात, 4 जण जिवंत जळाले, नेमकं काय घडलं?
Tv9 Marathi April 12, 2026 12:45 PM

महाराष्ट्राच्या विविध भागांत रस्ते अपघातांचे सत्र अद्याप सुरुच आहे. नुकतंच नाशिक आणि गोंदिया जिल्ह्यांत घडलेल्या दोन भीषण अपघात झाले आहेत. या दुर्दैवी घटनामध्ये एकूण ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. नाशिक आणि गोंदियातील अपघाताच्या भीषण स्वरूपामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच या घटनांनी अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे.

नाशिकमध्ये पिकअपला भीषण आग, ४ जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात शहा-पांचाळे रस्त्यावर शिंदेवाडी शिवारजवळ पहाटे १.१५ वाजताच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पांगरी गावात नातेवाईकाच्या घरी धार्मिक विधी आटोपून डझनभर नागरिक एका पिकअप वाहनातून पांचाळे गावाकडे परतत होते. यावेळी समोरून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने पिकअपला समोरासमोर जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, पिकअप वाहन ट्रकच्या धक्क्याने सुमारे १०० फूट दूरवर फरफटत गेले. या अपघातात पिकअपच्या इंधन टाकीचा स्फोट होऊन गाडीने काही क्षणांतच पेट घेतला. यावेळी इतकी भीषण आग लागली होती की वाहनातील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या आगीत किरण रवी मोरे (२३), शुभम गणेश नवले (२१) आणि रिंकू शुभम नवले (१९) मीराबाई विश्वनाथ गंगुर्दे (६८) या चौघांचा मृत्यू झाला.

तसेच अपघातात इतर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुनिता गणेश नवले (वय ३८) सचिन गणेश नवले (वय १८) दिव्या गणेश नवले (वय १७) समीक्षा अनिल गांगुर्डे (वय ९) आदिती पांडुरंग आहेर (वय १३) आरती पांडुरंग आहेर (वय ९) देवांश किरण मोरे (वय २) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर सिन्नर व नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच सध्या सिन्नर एमआयडीसी पोलीस ट्रक चालकावर कारवाई करत असून, घटनेचा सखोल तपास सुरू आहे.

‘हिट अँड रन’मध्ये पती-पत्नीचा जागीच मृत्यू

एकीकडे नाशिकमध्ये आगीचे तांडव सुरू असताना, दुसरीकडे गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात हिट अँड रनचा थरार पाहायला मिळाला. नवेगाव बांध जवळील पांढरवाणी नाल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात भरधाव वाहनाने मोटारसायकलला धडक दिली. या मोटारसायकलवरून एक पुरुष आणि दोन महिला प्रवास करत होते. समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

ही धडक इतकी भीषण होती की, मोटारसायकल चालवणारा पुरुष आणि एक महिला यांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरी महिला गंभीर जखमी झाली असून, तिला तातडीने गोंदिया जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. नवेगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, आरोपी चालकाचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांत घडलेल्या या अपघातांमुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आणि निष्काळजीपणा यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. यामुळे रात्री प्रवास करताना वाहनधारकांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्रभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.