कर्जत-खोपोली मार्गाला दिलासा
भूसंपादन मोबदल्यामुळे रखडलेली कामे पुन्हा सुरू, रस्त्याच्या दुरुस्तीला वेग
कर्जत, ता. १२ (बातमीदार) ः कर्जत-पळसदरी-खोपोली या अनेक वर्षांपासून खड्ड्यांनी विदीर्ण झालेल्या मार्गावरील नागरिकांना आता मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८अ अंतर्गत सुरू असलेल्या या रस्त्याच्या कामाला भूसंपादन मोबदल्याच्या प्रक्रियेमुळे मोठा अडथळा निर्माण झाला होता. मात्र, प्रशासनाने आता या प्रक्रियेला गती दिल्याने रखडलेली कामे पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर ६ तारखेला कर्जत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस प्रशासनातील अधिकारी, एमएमआरडीएचे प्रतिनिधी तसेच आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते. बैठकीत भूसंपादन मोबदल्याबाबत ठोस निर्णय घेण्यात आले. ज्या गावांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्या गावांतील शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित गावांचे मूल्यांकन आणि मोजणी प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.
दरम्यान, आंजरुण आणि माणकिवली या गावांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यांचा मोबदला संबंधित कार्यालयात जमा करण्यात आला आहे. तसेच नावंढे, डोलवली, हाल खुर्द, तळवली, वर्णे आणि नांगुर्ले या गावांतील सुमारे १४० शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
२०१७ पासून सुरू असलेल्या या प्रकल्पाला मोबदल्याच्या प्रश्नामुळे वारंवार अडथळे आले होते. परिणामी रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून, प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता.
चौकट
मोबदला मिळाल्याने मार्ग मोकळा
भूसंपादन मोबदल्याचा प्रश्न सुटू लागल्याने या महामार्गाच्या कामातील सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत रस्त्याची दुरुस्ती, डांबरीकरण आणि उर्वरित कामे जलद गतीने पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा लाभ मिळणार असून, अनेक वर्षांपासूनचा त्रास संपण्याची आशा व्यक्त केली जात आहे.