ऑपरेशन टायगरची गरज नाही, आता साध्या गोळीवरही लोक माझ्याकडे येतात, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
सुनील दिवाण, एबीपी माझा April 12, 2026 10:43 PM

Eknath Shinde :  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर करणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मला आता कुठल्या ऑपरेशनची गरज नाही. मी एकदाच ऑपरेशन केले ते लोकांच्या लक्षात आहे. आपला जनसेवा अजेंडा असल्यामुळे लोक माझ्याकडे येतात. आताही ऑपरेशन नाहीतर साध्या गोळीवर लोके माझ्याकडे येतील, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावत. एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टागरबाबत सुरु असलेल्या विविध चर्चांना पूर्णविराम दिला आहे. येत्या काळात मोठे इन्कमिंग होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. 

पंढरपुरात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांचा पक्षप्रवेश

पंढरपुरात एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांचा पक्षप्रवेश झाला आहे. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगरवर भाष्य करत मोठ्या इन्कमिंगचे संकेत दिले आहेत. तसेच यावेळी शेरोशायरी आणि अभंग गात शिंदेंनी जोरदार फटकेबाजी केली. पैसे हे जनतेचे असून तेच आपण घेतोय असे सांगत जनतेच्या पैशावर कोणाचाही अधिकार नसल्याचा टोलाही त्यांनी नाव न घेता पालकमंत्री जयकुमार गोरे यांना लगावला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंचायत राज निवडणुकीत विरोधकांना तुम्हाला निधीसाठी आमच्याकडेच यावे लागेल असे सुनावले होते. त्यावेळी भालके हे विरोधी गटात होते, मात्र, आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पैशावरून हा टोला लगावला आहे.

आपण भालके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत 

आज एकनाथ शिंदे यांनी कुठलीही ठोस घोषणा केली नसली तरी आपण भालके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे सांगितले आहे. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेनेचा संघर्ष अधिक टोकेरी बनणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

निधी देणारा माणूस इथे स्टेजवर बसलाय, शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच भगीरथ भालकेंचं जयकुमार गोरेंना आव्हान

आज प्रवेश झाल्याच्या पहिल्याच दिवशी भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore)  यांना आव्हान दिले आहे. निधी देणारा माणूस इथे स्टेजवर बसलाय येऊन बघ अशा पद्धतीने भालके यांनी थेट पालकमंत्र्यांना आता अंगावर घेतलेला आहे त्यामुळे भविष्यात भाजप विरुद्ध शिवसेना असाच कलगीतुरा पंढरपूर मध्ये पाहायला मिळणार आहे

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.