- श्रीधर फडके, ज्येष्ठ संगीतकार-गायक
आशा भोसले या गायिका म्हणून फार श्रेष्ठ आणि व्यक्ती म्हणून फार छान! माझ्या वडिलांचे, बाबूजींचे (सुधीर फडके) आणि माझ्या आईचे त्यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे आणि घरगुती संबंध होते. आशाताई पहिल्यांदा १९४९च्या सुमारास ‘जिवाचा सखा’ या चित्रपटाच्या निमित्ताने बाबूजींकडे गायला आल्या होत्या. त्यावेळी पुण्यातील आमच्या घरीच राहिल्या होत्या. बाबूजींना त्या फडके साहेब म्हणायच्या. ‘फडके साहेबांचं गाणं आहे, मी रियाज करूनच गाणार,’ असं त्या नेहमी सांगायच्या.
एकदा आशाताई गाण्यासाठी उभ्या राहिल्या की सगळं वातावरण एकदम बदलून जात असे, स्टुडिओत वेगळेच चैतन्य पसरायचे. बाबूजींकडे केलेली त्यांची अनेक रेकॉर्डिंग मी महाविद्यालयीन काळात प्रत्यक्ष ऐकली आहेत. ‘धुंदी कळ्यांना’, ‘का रे दुरावा’, ‘आज कुणीतरी यावे’, ‘माझ्या रे प्रीतिफुला’ अशी गाणी ऐकल्याचं मला आठवतं. त्यावेळी कळलं नाही, पण आज जाणवतं की प्रत्येक गाण्याच्या गरजेनुसार आशाताईंनी ते-ते गाणं गायलं आहे.
रेकॉर्डिंगच्या आधी रियाजाला बसताना त्या बाबूजींचं निरीक्षण करायच्या. ‘बाबूजी गाणं गाऊन दाखवत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि हातांच्या हालचाली मी आत्मसात करते’, असं त्या सांगायच्या. प्रत्येक अक्षरावर, शब्दावर होणारी हालचाल त्या टिपायच्या आणि तेच ‘एक्सप्रेशन्स’ त्यांच्या गाण्यात अचूक उतरायचे.
चित्रपटातलं गाणं असलं, तर पडद्यावरची अभिनेत्री कोण आहे, प्रसंग काय आहे, हे विचारून घेऊनच त्या गायच्या. एस. डी. बर्मन यांचं ‘बंदिनी’मधलं गाणं असो, शंकर-जयकिशन यांचं ‘पान खाये सैंया हमारो’ असो, किंवा बाबूजींचं ‘आज कुणीतरी यावे’ आणि ‘एकाच या जन्मी जणू’ असो; या गाण्यांमधून त्यांनी दिलेले ‘एक्सप्रेशन्स’ हेच त्यांच्या आवाजाचे खरे वेगळेपण होते.
‘काय रे, किती कठीण गाणं केलंय!’
आशाताईंनी ‘ऋतू हिरवा’, ‘साकार गंधार’ यांसारख्या अल्बमसाठी माझी गाणी गायली, हे खरंतर मला मिळालेलं सर्वांत मोठं पारितोषिक आहे. मी मुखडा ऐकवला की त्या थोडं रागाने माझ्याकडे बघायच्या आणि म्हणायच्या, ‘काय रे, किती कठीण गाणं केलंय, मी कशी गाणार?’ नंतर अगदी लीलया गाऊन जायच्या. ‘ऋतू हिरवा’मधला वरचा मध्यम किंवा ‘सांज ये गोकुळी’मधला कोमल रिषभ ऐकणं, म्हणजे केवळ विलक्षण अनुभव!
एकदा ‘माझिया मना, जरा थांबा ना’ या गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू होतं. त्यांनी दोन वेळा ते गाणं गायलं आणि माझ्याकडे बघितलं. मी म्हटलं छान झालंय; पण त्यांनी माझ्या चेहऱ्यावरील भाव ओळखले आणि म्हणाल्या, ‘नाही रे, तुला काही पसंत पडलेलं दिसत नाही, मी परत गाते.’ त्यानंतर पदर खोचून त्या अशा काही गायल्या, की मी उत्स्फूर्तपणे ‘क्या बात है!’ म्हणालो. संगीतकाराला नेमकं काय हवंय, हे ओळखणारा खरा कलाकार असतो. आशाताई तशा होत्या.
एवढी मोठी विख्यात गायिका असूनही त्यांच्यातील माणूसपण फार विलोभनीय होते. आमच्या दादरच्या घरी आल्यावर ‘मला भूक लागली आहे, पोळी-भाजी खायची आहे’, असं हक्काने सांगायच्या. त्यांच्या घरी गेल्यावरही ‘जेवण करूनच जा’, असा त्यांचा आग्रह असायचा. गाण्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी जपलेले हे संबंध आज खूप आठवतात.
(शब्दांकन - महिमा ठोंबरे)