Beed News: 'सीतेच्या न्हाणी'चे वैभव पडले अडगळीत; विकासाचा वनवास; किल्ले धारूरच्या ऐतिहासिक स्थळांची दुरवस्था वाढली
esakal April 13, 2026 12:45 PM

किल्ले धारूर: बालाघाटच्या डोंगररांगांमध्ये वसलेले धारूर शहर म्हणजे निसर्ग, अध्यात्म आणि पराक्रमाचा एक अद्भूत संगम. मात्र, याच डोंगरदऱ्यात दडलेला आपला अमूल्य वारसा आज काळाच्या ओघात हरवत चालला की काय, अशी भीती वाटू लागली आहे. शहराच्या उत्तरेला गोपाळपूर मार्गावर वसलेले ‘सीतेची न्हाणी’ हे पौराणिक स्थळ आज प्रशासकीय दुर्लक्षामुळे ओसाड होत असून, येथील ऐतिहासिक पाऊलखुणा पुसल्या जात आहेत. वनवासात असताना माता सीतेने ज्या ठिकाणी स्नान केले, अशी धारणा असलेले हे स्थळ आणि येथील बारमाही वाहणारा गरम पाण्याचा झरा आज जतन आणि संवर्धनासाठी साद घालत आहे.

धारूरला केवळ पौराणिकच नव्हे, तर लष्करी इतिहासही लाभला आहे. पश्चिमेस ३७ एकरात पसरलेला महादुर्ग किल्ला आजही सरदार नेताजी पालकर यांच्या पराक्रमाची साक्ष देतो. तर दुसरीकडे अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार केलेले आई अंबाचंडी मातेचे प्राचीन मंदिर जिल्ह्याची सांस्कृतिक परंपरा जपते आहे. या मंदिराच्या जोडीलाच सीतेची नाहणी येथील महादेवाचे मंदिर आणि नैसर्गिक गरम पाण्याचा झरा पर्यटनाच्या दृष्टीने मोठी संधी उपलब्ध करून देतात. मात्र, पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या स्थळांवर अस्वच्छता आणि सोयी-सुविधांचा मोठा अभाव दिसून येत आहे. योग्य संवर्धन न झाल्यास हा अमूल्य ठेवा केवळ इतिहासाच्या पानांवरच उरेल, अशी खंत नागरिक व्यक्त करत आहेत.

Beed News: आत कोण आहे? किती वेळ लावताय? लवकर बाहेर या; बसस्थानकाच्या स्वच्छतागृहात प्रवाशांचा मानसिक छळ; नशिबी दुर्गंधीचे आगार अन्यथा होईल इतिहास जमा!

स्थानिक प्रशासनाने या ऐतिहासिक स्थळांचा सविस्तर विकास आराखडा तयार करून तातडीने कामाला सुरुवात करणे गरजेचे आहे. पर्यटनाच्या दृष्टीने रस्ते, स्वच्छता आणि माहिती फलक लावल्यास या स्थळांचे वैभव पुन्हा उजळून निघू शकते. अन्यथा, भविष्यात हा वारसा कायमचा इतिहास जमा होईल, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

गरम पाण्याचा झरा; निसर्गाचे अनोखे लेणे

सीतेची न्हाणी परिसराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथील बारमाही वाहणारा गरम पाण्याचा झरा. कडक उन्हाळा असो वा हिवाळा, या पाण्याचा प्रवाह आणि तापमान कायम राहते. मात्र, देखभालीअभावी या कुंडाची अवस्था सध्या दयनीय झाली असून, येथे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी व बसण्यासाठी कोणतीही सोय उपलब्ध नाही.

Premium|Mahatma Phule Bicentenary : फुलेंच्या विचारांचा द्विशताब्दी प्रवास; शताब्दी वादंग, सत्यशोधक चळवळ आणि आजच्या महाराष्ट्राची दिशा

"धारूर शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या ठिकाणी सीतेची नाहणी, राम पादुका अशी महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत. मात्र, ही सर्व ठिकाणे सध्या विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. भविष्यात जर याकडे दुर्लक्ष केले, तर ही स्थळे नामशेष होतील."

- बालाजी चव्हाण, नागरिक

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.