रायगड : सुट्ट्या लागल्यानंतर कुठेतरी धाडसी trekking जाण्यासाठी सध्याची तरुणाई उत्सुक असते, अनेकदा ट्रेकींगची आवड जोपासत वेगवेगळ्या गडांवर, दरी, डोंगररांगात जाऊन भटकंती करण्याचाही छंद तरुणाई जपत आहे. मात्र, याच छंदातून काहीवेळा गंभीर अपघाताच्या घटना घडतात. अनेकदा उंच डोंगरमाथ्यावरुन, दरीतून तोल जाऊन नाहक जीव गमवावा लागतो किंवा कधी कधी कायमचं अपंगत्व देखील येतं. रायगड (Raigad) जिल्ह्याच्या इर्शाळ गडावर अशीच दुर्घटना घडली असून 26 वर्षीय तरुणाचा गडाच्या पायथ्याला मृतदेह आढळून आला.
रायगडच्या इर्शाळ गडावर ट्रेकिंगसाठी आलेल्या पर्यटकाचा दरीत पडून मृत्यू झाला आहे. जिल्ह्याच्या खालापुर तालुक्यातील इर्शाळवाडी येथील ही दुर्घटना असून भिवंडी येथील आकाश वाघमोडे (वय 26) हा तरुण काल रविवारी इर्शाळगडावर सोलो ट्रेकिंगसाठी आला होता. मात्र, एकटाच ट्रेकींगसाठी आला असता तो दरीत कोसळल्याने दुर्दैवी घटना घडली. आकाशची मोटर सायकल इर्शाळगडाच्या पायथ्याशी सापडली, तर त्याचा संपर्क होत नसल्याने पोलिसांनी तपास सुरू केला होता. खालापुर पोलिस आणि खोपोली येथील हेल्प फाऊंडेशन यांनी सोमवारी शोधकार्य सुरु केले असता आकाशचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला. इर्शाळगडाच्या दरीत पायथ्याशी आकाशचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर, पोलिसांनी संबंधित घटनेचा पंचनामा केला असून त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली.
दरम्यान, ट्रेकींगसाठी उंच गडावर किंवा डोंगरदऱ्यांमध्ये जाताना तरुणांनी काळजी घ्यावी, शक्यतो सोलो ट्रेकींगऐवजी ग्रुप ट्रेकींग करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
माझा भाऊ इथं आयजी आहे, त्याला मला धर्मसंकटात टाकायचं नाही; नांगरे पाटलांनी सांगितला आशाताईंचा किस्सा