देवरूख ःस्वच्छ नदी, समृद्ध गाव सांगवेकरांचा नवा संकल्प
esakal April 13, 2026 09:46 PM

rat13p3.jpg-
37010
देवरूख ः सप्तलिंगी नदीतील गाळ उपसा मोहिमेला सांगवे येथे प्रारंभ झाला.
-------------

‘स्वच्छ नदी-समृद्ध गाव’ सांगवेकरांचा नवा संकल्प
सप्तलिंगी नदीचे पुनरुज्जीवन; नाम फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली गाळ उपशास प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. १३ ः जल हेच जीवन आणि पाणी हीच समृद्धी, हा केवळ मंत्र न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी तालुक्यातील सांगवे येथील ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. गावविकासासाठी आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सांगवे ग्रामस्थांनी ‘नाम फाउंडेशन’ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भास्कर शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सप्तलिंगी नदी पुनरुज्जीवनाचे अत्यंत स्तुत्य पाऊल उचलले आहे. या उपक्रमामुळे संपूर्ण पंचक्रोशीत निसर्ग संवर्धनाचा एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.
सप्तलिंगी नदीपात्रातील गाळ उपसण्याच्या आणि अडथळे दूर करण्याच्या मोहिमेचा प्रारंभ ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आला. अनेक वर्षांपासून नदीपात्रात साचलेला गाळ आणि मोठ्या दगडांमुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बाधित झाला होता. हे अडथळे दूर करून नदीला तिचे मूळ स्वरूप मिळवून देणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. हे ऐतिहासिक कार्य नाम फाउंडेशन आणि सांगवेमधील ज्येष्ठ नागरिक भास्कर शेलार यांच्या विशेष सहकार्यातून आकारास येत आहे. नदीपात्रातील गाळ काढल्यामुळे केवळ पाण्याचा प्रवाह मोकळा होणार नाही, तर तिची पाणी साठवण क्षमताही वाढणार आहे. याचा थेट सकारात्मक परिणाम गावातील शेतीवर आणि भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यावर होणार असून, भविष्यातील जलसंकट दूर होण्यास मदत होईल.
या प्रसंगी नाम फाउंडेशनचे समीर जानवरकर, भास्कर महादेव शेलार यांच्यासह गावचे प्रथम मानकरी सदानंद शेलार, उत्सव कमिटी अध्यक्ष बाळोजी शेलार, सरपंच दूर्वा शेलार, पोलिसपाटील विजय शेलार, माजी सरपंच देवदत्त शेलार, विलास शेलार, माने, प्रमोद शेलार आदी उपस्थित होते.

चौकट
‘सप्तलिंगी’ पुन्हा खळाळणार
‘नदी स्वच्छता ही केवळ भौतिक सुधारणा नसून, ती पुढच्या पिढीसाठी केलेली एक महत्त्वाची गुंतवणूक आहे,’ अशी भावना या वेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. निसर्ग संवर्धनाचा हा आदर्श सांगवेने संपूर्ण तालुक्यासमोर उभा केला आहे. या उपक्रमामुळे गावाच्या समृद्धीला नवी दिशा मिळणार आहे. या मोहिमेमुळे आता सप्तलिंगी नदी पुन्हा एकदा खळाळती होणार असून, सांगवे गाव ‘पाणी’दार होण्याच्या दिशेने भक्कम पाऊल पडले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.