अहमदाबाद : गुजरातमधील स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत एक अनोखा प्रकार समोर आला आहे. एका उमेदवारानं भाजप, आप आणि काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गुजरातमधील दाहोद जिल्हा परिषदेच्या पिपेरो या जागेवर स्थानिक उमेदवार भरत सिंह वखाला यांनी तिन्ही पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळं या प्रकरणाची सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे.
भरत सिंह वखाला यांनी पहिल्यांदा आम आदमी पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज 10 एप्रिल रोजी दाखल करण्यात आला. यानंतर 11 एप्रिलला वखाला यांनी काँग्रेस आणि भाजप उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. राज्यातील निवडणुकीच्या इतिहासात ही अनोखी घटना ठरली आहे. वखाला यांनी यापूर्वी आम आदमी पार्टीकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी भाजपला कडवं आव्हान दिलं होतं. मात्र, वखाला यांनी राजकीय पक्ष बदलल्याचं पाहायला मिळालं आहे.
वखाला काही दिवसांपूर्वी भरत सिंह वखाला काँग्रेसमधून आम आदमी पार्टीत गेले होते. मात्र, नंतर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पिपेरो या जागेवर एकूण 11 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. यामध्ये भाजपचे 5 उमेदवार आहेत. यामध्ये वखाला यांच्या नावाचा समावेश आहे. काँग्रेसनं देखील 2 उमेदवार दिले आहेत, त्यांच्या यादीत देखील वखाला यांच्या नावाचा समावेश आहेत. आम आदमी पार्टीकडून एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे जो भरत सिंह वखाला यांचा आहे. याशिवाय दोन अपक्ष रिंगणात देखील रिंगणात आहेत. बीआरपी या पक्षाकडून देखील एक उमेदवार देण्यात आला आहे. मात्र, गुजरातच्या राजकारणात तीन पक्षांनी एकच उमेदवार देण्याचा पेच निर्माण झाला आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 15 एप्रिल आहे, त्या दिवशी भरत सिंह वखाला यांनी कोणत्या राजकीय पक्षाचा एबी फॉर्म जमा केला आहे ते स्पष्ट होईल. याशिवाय कोणत्या पक्षाचा उमेदवारी अर्ज मागं घेतला ते देखील स्पष्ट होईल.
भरत सिंह वखाला यांनी आम आदमी पार्टीकडून आणि काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. वखाला यांनी 2017 आणि 2022 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, दोनवेळा ते पराभूत झाले होते. तीन राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यासंदर्भात वखाला यांनी लवकरच चित्र स्पष्ट होईल असं म्हटलं. दरम्यान, भरत सिंह वखाला यांना तीन पैकी दोन उमेदवारी अर्ज मागे घ्यावे लागणार आहेत.
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पत्र लिहून राज्यातील स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत आपच्या कार्यकर्त्यांविरोधात नियोजित पद्धतीनं कारवाई केली जात असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्र्यांसोबत यावर चर्चा करण्यासाठी बैठकीला उपस्थित राहण्यास तयार असल्याचं केजरीवाल म्हणाले.