Eknath Shinde : पुरंदर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विआमदार विजय बापू शिवतारे यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. त्यांची मुलगी डॉ. ममता शिवतारे यांनीच जन्मदात्या पित्याला आपली किडनी दान करुन त्यांना जीवनदान दिले आहे. आज मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय बापू शिवतारेंची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली. लवकरच त्यांनी पूर्ण बरे होऊन पुन्हा एकदा त्याच जोमाने जनसेवेसाठी सज्ज व्हावे अशा शुभेच्छा त्यांना दिल्या.
दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात विजय शिवतारे यांची भेट घेतल्यानंतर शिवतारेंनी त्यांचे आभार मानलेत. एकनाथ शिंदे साहेब यांनी आज रुग्णालयात येऊन माझी आत्मीयतेने भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. शिंदे साहेबांसारखे संवेदनशील, जनतेशी नातं जपणारं नेतृत्व लाभणं, हा माझ्यासाठी खरोखरच अभिमानाचा आणि आयुष्यभर लक्षात राहणारा क्षण असल्याचे मत विजय शिवतारे यांनी व्यक्त केले.