Bigg Boss Marathi 6 Reva Kaurse Evicted: 'बिग बॉस मराठी 6'चा (Bigg Boss Marathi) शो आता अंतिम टप्प्यात आलाय. आता बिग बॉसनं सदस्यांसमोरील आव्हान अधिकाधिक कठीण करायला सुरुवात केलीय. यंदाच्या सीझनची टॅग लाईनच आहे, 'हा सीझन 6 आहे, इथे ट्वीस्ट फिक्स आहे...' आणि आता आपल्या टॅगलाईननुसारच, बिग बॉसनी (Bigg Boss) वागायला सुरुवात केलीय. आता घरात प्रत्येक क्षणाक्षणाला ट्वीस्ट अनुभवायला मिळतोय. घरातील सदस्यांसाठी त्यांनी टाकलेलं प्रत्येक पाऊल काळजाचा ठोका चुकवतंय. अशातच घरात फिनालेची चुरस रंगलेली असताना पुन्हा एकदा बिग बॉसनी एक ट्वीस्ट आणून सर्वांना जोरदार धक्का दिलाय. ग्रँड फिनाले (Bigg Boss Marathi 6 Grand Finale) अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि अशातच घरातील एका सदस्याचं स्वप्न भंग झालंय. घरातून एका सदस्याला एलिमिनेट करण्यात आलंय.
'बिग बॉस मराठी 6'चा खेळ आता आणखी रंगतदार झालाय, जिथे प्रत्येक क्षण प्रेक्षकांचा श्वास रोखून धरणारा ठरतोय. महाअंतिम सोहळा अगदी जवळ आला असतानाच घरात घडलेल्या एका धक्कादायक घडामोडीनं स्पर्धकांसह प्रेक्षकांनाही आश्चर्यचकित केलंय. टॉप 6 मध्ये पोहोचलेल्या एका दमदार स्पर्धकाचा प्रवास फायनलच्या उंबरठ्यावरच थांबलाय.
'बिग बॉस मराठी 6'च्या स्पर्धकांसाठी हा आठवडा अनपेक्षित धक्क्यांनी भरलेला ठरला. गेल्या आठवड्या टीआरपी क्वीन राखी सावंत एलिमिनेट झाल्यानंतर 'भाऊच्या धक्क्या'वर रितेश देशमुख यांनी याआधीच सूचक इशारा दिला होता की, काहीतरी वेगळं आणि अनपेक्षित घडणार आहे. तोच अनपेक्षिक धक्का बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना कालच्या एपिसोडमध्ये मिळाला.
रात्रीच्या सुमारास गार्डन एरियामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा खेळ मांडण्यात आला होता. इंद्रधनुष्याच्या सात रंगांच्या चौकोनांमध्ये 'गोल्डन की' ठेवण्यात आल्या होत्या. हे चौकोन केवळ खेळाचा भाग नव्हते, तर प्रत्येक स्पर्धकाच्या भवितव्याचा निर्णय ठरणार होते. प्रत्येक स्पर्धकानं आपल्या रांगेतून एक किल्ली निवडून त्यासोबत दिलेला संदेश मोठ्यानं वाचायचा होता. या टास्कचा नियम मात्र खूपच धक्कादायक होता, जो स्पर्धक रंगांच्या या पटातून सर्वात आधी बाहेर येईल, त्याला ग्रँड फिनालेचं तिकीट मिळणार नव्हते. या खेळानंतर राकेश बापट हा या सिझनमधील दुसरा फायनलिस्ट ठरला, तर त्याच्या पाठोपाठ अनुश्री तिसरी फायनलिस्ट झाली. मात्र, दुर्दैवानं वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात आलेल्या रेवा कौरसेचा प्रवास अगदी शेवटच्या टप्प्यावर येऊन संपला.
रेवा कौरसे बाहेर गेल्याची घोषणा होताच, घराचं वातावरण एका क्षणात बदलून गेलं. जी रेवा घरातील प्रत्येकाच्या सुख-दुःखात सोबत असायची, ती आता फिनालेमध्ये नसेल. अनुश्री माने तर विशालसोबत उभी राहून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचे अश्रू थांबत नव्हते. रेवा आणि तन्वी यांनाही त्यांचे अश्रू रोखणं कठीण होतंय.
रेवा कौरसे घराबाहेर गेल्यानंतर आता 'बिग बॉस मराठी सीझन 6'चे टॉप 5 स्पर्धक मिळाले आहेत. आता घरात तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, दिपाली सय्यद आणि विशाल कोटियान हे टॉप 5 सदस्य मिळाले आहेत.