Trimbakeshwar VIP Darshan Scam: त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त कडलगला अटक
esakal April 15, 2026 11:45 AM

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील भाविकांना दहा मिनिटांत ‘व्हीआयपी’ दर्शन घडविण्याच्या नावाखाली ३ हजारांची लूट केल्याप्रकरणी देवस्थानचे विश्वस्त तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा साथीदार गोटीराम पेहरे यालाही पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात मंगळवारी (ता. १४) हजर केल्यानंतर दोघांनाही २० तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

देशातील बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या आणि सिंहस्थ- कुंभमेळ्याला अवघे एक वर्षांचा कालावधी असल्याने त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. भाविकांना दर्शनासाठी तासन् तास रांगेत उभे रहावे लागते. नगरपालिकेतर्फे २०० रुपयांत दर्शनाची अधिकृत व्यवस्थेची स्वतंत्र रांग निर्माण करण्यात आलेली आहे. त्यालाही मर्यादा घातल्यामुळे भाविकांना दर्शनासाठी रांगेत उभे रहावे लागते. याचा गैरफायदा घेत दलालांनी ‘दहा मिनिटांत ‘व्हीआयपी’ दर्शन’ अशा स्वरूपाचे आश्वासन देऊन भाविकांना गंडा घातल्याचा प्रकार ‘सकाळ’ने ५ मार्च २०२६ रोजी प्रकाश झोतात आणला होता. ‘स्टिंग ऑपरेशन’ करत येथील दर्शनाच्या नावाखाली आर्थिक लुटीचे वास्तव मांडले. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आणि पोलिसांनी त्याचा छडा लावण्यासाठी ‘स्टिंग ऑपरेशन’ राबविले. यामध्ये पोलिसच भाविक बनून गेले. केवळ एका दिवसात तीन वेगवेगळ्या भाविकांकडून प्रत्येकी तीन हजार रुपयांची लूट होत असल्याचे पुराव्यासह उघड झाले. या कारवाईत एका ‘एजंट’ला ताब्यात घेतल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार, या लुटीचे धागेदोरे थेट त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त कडलगपर्यंत पोहोचले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने कडलगला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

दहा मिनिटांत दर्शन तीन हजारांना!

त्र्यंबकेश्वर येथे भाविकांना हेरून थेट मंदिरापर्यंत घेवून पोहोचवण्यासाठी २०० ते ३०० रुपये घेतले जातात. थेट मंदिरात दर्शन घ्यायचे असल्यास प्रत्येक भाविकाकडून ३ हजार रुपये घेतले जातात. मंदिराच्या उत्तर दरवाजाजवळ दर्शन घडविणारी टोळीच कार्यरत आहे. त्यांना विश्वस्तांचा फोन आल्यानंतर या भाविकांना दर्शनासाठी आतमध्ये सोडले जाते. दर्शन घेऊन बाहेर पडण्यापूर्वीच भाविकांकडून तीन हजार रुपये घेतले जातात.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.